"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 17:55 IST2025-08-14T17:52:42+5:302025-08-14T17:55:57+5:30
Sunil Tatkare News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी आज केला.

"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा
मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी आज केला. लाडकी बहीण योजना फसवी आहे, असा आरोप विरोधक करत आहेत. महिलांचा स्वाभिमान १५०० रुपयात विकत घेण्यात आला, असा आरोप करण्यात आला. पण जी व्यक्ती सोन्याचा चमचा घेऊन आली आहे, तिला लाडकी बहीण योजना काय समजणार आहे, असा टोलाही सुनिल तटकरे यांनी यावेळी लगावला.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसची आढावा बैठक आज मुंबईतील महिला विकास मंडळ सभागृहात राज्यातील प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांचा उपस्थितीत आगामी निवडणुकांसंदर्भात पार पडली, त्यावेळी सुनिल तटकरे यांनी मार्गदर्शन केले. सर्व समाज घटकांतील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे. हे सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार जिथे उभा असेल तिथे अजितदादांच्या रूपाने पक्षाची ताकद उभी केली जाईल, असे आश्वासन सुनिल तटकरे यांनी यावेळी महिलांना दिले.
निवडणूक आयोगाचे नवीन मतदार नोंदणीचे काम सुरूच असते. निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर केली जाते. मतदारांकडून हरकती मागविल्या जातात आणि मतदारनिहाय आकडेवारीही जाहीर केली जाते. संबंधित मतदारयादी त्या-त्या पक्षाला निवडणूक आयोगाकडून पाठवली जात असते. खरं म्हणजे त्यावेळी विरोधकांनी हरकत नोंदवायला हवी असते. मात्र विरोधक सध्या महाराष्ट्राला टार्गेट करत आहे असा थेट हल्लाबोल सुनिल तटकरे यांनी केला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ५० टक्के जागा महिलांसाठी असतील. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्त जागा मिळतील यात शंका नाही. येणारी निवडणूक जिंकायची आहे. विधानसभेत जशा जास्त जागा मिळाल्या आहेत. ते पहाता पुढच्या काळात आपली जबाबदारी वाढणार आहे हेही आवर्जून सुनिल तटकरे यांनी सांगितले.
अल्पसंख्याक समाज विधानसभा निवडणुकीत आपल्यापासून दुरावला होता आहे. परंतु आता राष्ट्रवादीकडे अल्पसंख्याक समाज येत आहे. आम्ही धर्मनिरपेक्ष असून शिव - शाहू - फुले - आंबेडकरांच्या विचारधारेनुसार काम करत आहोत अशी स्पष्ट भूमिका सुनिल तटकरे यांनी यावेळी मांडली.निवडणूकीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. आगामी निवडणुकांना महायुती म्हणून सामोरे जायचे आहे. कुणावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.
महाराष्ट्रात जे राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने काम करत आहेत त्यात सरस काम राष्ट्रवादी महिला काँग्रेस करत आहे. जिल्हा नियोजनावर एक तरी महिला असली पाहिजे आणि ती संघटनेची असली पाहिजे. महिलांनी केलेल्या कामाची दखल पक्ष नक्कीच घेणार आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.
राजकारणात वैचारीक लढाई ही होत असते. प्रत्येक पक्ष काम करत असताना वैचारिक लढाई लढत असताना काही जण आपला स्तर खाली आणत आहेत. त्यामुळे पक्ष संघटनेचे काम चौकटीतच राहून केले पाहिजे. पदाचा वापर पक्षाच्या शिस्तीच्या विरोधात असता कामा नये असेही सुनिल तटकरे यांनी महिलांना सांगितले.
आगामी निवडणूका चांगल्या लढल्या तर पुढील लोकसभा, विधानसभा आपल्याला ताकदीने लढता येणार आहेत हे लक्षात घ्या. स्थानिक पातळीवरील नेतृत्व राज्यपातळीवर येऊ शकते हे सांगतानाच पुणे हे आपलं मातृत्व... नेतृत्व करणारा जिल्हा आहे. त्यामुळे पुणे जिल्हा कालही... आजही आणि उद्याही असेल यावर दुमत नाही असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.
चळवळीत काम करणाऱ्या आपण महिला आहात. राष्ट्रवादी काँग्रेसची महिला संघटना ही महिलांसाठी प्रभावीपणे काम करत आहे याचा मला अभिमान आहे अशा शब्दात सुनिल तटकरे यांनी कौतुक केले.