"मराठीच्या नावे राज्यात सुरू असलेली गुंडागर्दी अयोग्य, मराठी माणसाने...’’, काँग्रेसनं मांडली स्पष्ट भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 17:39 IST2025-07-09T17:37:16+5:302025-07-09T17:39:14+5:30
Harshvardhan Sapkal News: शांततेच्या मार्गाने जात असतील तर राज ठाकरे यांना शुभेच्छा आहेत. मात्र मराठीच्या नावाने सुरू असलेली मारहाण, गुंडागर्दी काही पटणारी नाही. मराठी माणसानं संयम बाळागावा, आपली सहिष्णुती, मराठी संस्कृती व महाराष्ट्र धर्म जागवावा

"मराठीच्या नावे राज्यात सुरू असलेली गुंडागर्दी अयोग्य, मराठी माणसाने...’’, काँग्रेसनं मांडली स्पष्ट भूमिका
पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या मुद्द्यावरून सध्या राज्यातील शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रामधील वातावरण चांगलंच तापलेलं आहे. तसेच राज्य सरकारने या संदर्भात काढलेले दोन शासन आदेश रद्द केले असले तरी नंतर घडलेल्या काही घटनांमुळे आता याला मराठी भाषिक विरुद्ध अमराठी भाषिक, मराठी विरुद्ध हिंदी असं रूप प्राप्त झालं आहे. त्याचदरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे हे एकत्र आल्याने राज्यात नवी समीकरणे आकारास येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच राज ठाकरे यांना महाविकास आघाडीमध्ये स्थान मिळेल का, असा प्रश्नही विचारला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. मराठीच्या नावे राज्यात सुरू असलेली गुंडागर्दी अयोग्य आहे, असे मत हर्षवर्धन सपकाळ यांनी मांडले आहे.
राज ठाकरे यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, शांततेच्या मार्गाने जात असतील तर राज ठाकरे यांना शुभेच्छा आहेत. मात्र मराठीच्या नावाने सुरू असलेली मारहाण, गुंडागर्दी काही पटणारी नाही. मराठी माणसानं संयम बाळागावा, आपली सहिष्णुती, मराठी संस्कृती व महाराष्ट्र धर्म जागवावा, असे आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
गिरणी कामगारांच्या मोर्चावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, लोकांच्या मागण्या ऐकुन घेणे आणि त्याचा सहानुभूतीने विचार करणे गरजेच आहे. पण भाजपा सरकार कोणाशीच चर्चा करायला तयार नाही. त्यांना फक्त बिल्डर व उद्योगपतींशी चर्चा करण्यातच जास्त रस आहे. मुक्या, बहिऱ्या आणि आंधळ्या सरकारने यातून बाहेर यावे असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
यावेळी सपकाळ यांनी आमदार संजय गायकवाड यांनी कँटिनमध्ये केलेल्या मारहाणीवरही टीका केली. ते म्हणाले की, महाराष्ट्रात सत्ताधारी आमदारांचा धुमाकूळ सुरू आहे आणि सरकारची पकड राहिलेली नाही. महायुतीच्या आमदारानी अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. संजय गायकवाड यांचे यापूर्वी फोन व्हायरल झाले होते. या माणसाला वाचाळवीर ही पदवी उपमुख्यमंत्री यांनी दिली होती. ते सातत्याने बेताल वक्तव्य करत असतात. राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला १ लाख रुपये बक्षीस देऊ, फडणवीसांच्या तोंडात कोविडचे जंतु घाला, असे हा वाचाळवीर बोलला होता, हा विछिप्त व्यक्ती आहे. कँन्टीनवाल्याची काही चुक असेल तर सरकारकडे तक्रार करून त्याचे कंत्राट रद्द करा. विशेष म्हणजे हे सर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाकाखाली सुरु आहे. नेहमी रामशास्त्री प्रभुणे सारखा आव आणणाऱ्या फडणविसांनी जागे व्हावे व कारवाई करावी.