शिंदे-शाह भेटीबाबत संजय राऊतांचा खळबळजनक दावा; राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 13:39 IST2025-07-11T13:38:26+5:302025-07-11T13:39:42+5:30

दिल्लीपुढे नाक घासणे, वारंवार झुकणे हे स्वत:ला बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार म्हणवतात, त्यांनी हे करणे महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं.

"The group will merge with BJP, make me the Chief Minister"; Eknath Shinde's demand to Amit Shah, Sanjay Raut's sensational claim | शिंदे-शाह भेटीबाबत संजय राऊतांचा खळबळजनक दावा; राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ?

शिंदे-शाह भेटीबाबत संजय राऊतांचा खळबळजनक दावा; राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ?

मुंबई - देवेंद्र फडणवीस आमची कोंडी करतायेत अशी नेहमीप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी अमित शाहांकडे तक्रार केली. ते आम्हाला काम करू देत नाही. आम्हाला अडचणीत आणतायेत. आमच्या आमदारांच्या चौकशी करतायेत असा शिंदेंच्या तक्रारीचा सूर होता. त्यानंतर त्यांनी आमचा गट विलिन करू, पण मला मुख्यमंत्री करा अशी मागणी अमित शाह यांच्याकडे केली असा खळबळजनक दावा संजय राऊतांनी अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर केला आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले की, शिंदे गटाचे पक्षप्रमुख दिल्लीत आहेत. त्यामुळे गुरूपोर्णिमेसाठी ते दिल्लीला जाणारच होते. गुरु म्हणून अमित शाहांच्या चरणावर डोके ठेवले, चाफ्याची फुले वाहिली. फोटो काढता आले नसले तरी माझ्याकडे पक्की माहिती आहे. एकनाथ शिंदे यांनी अमित शाहांकडे स्वत:च ऑफर ठेवली. महाराष्ट्रात मराठी माणसांची एकजूट झाली आहे. ही एकजूट अधिकाधिक भक्कम होईल त्याचा त्रास आम्हाला होईल. याकडे तुम्हाला लक्ष घालावे लागेल. मराठी माणसाची एकजूट तुटली नाही तर राजकीय दृष्ट्‍या आपल्याला फार मोठी अडचण होईल अशी चर्चा शाह-शिंदे यांच्यात झाली असं त्यांनी सांगितले. 

तसेच शिंदेंचे ऐकून घेतल्यानंतर अमित शाह यांनी तुमच्या मनात काय आहे असं विचारले, तेव्हा शिंदेंनी म्हटलं, मला मुख्यमंत्री करणे हा त्यावरचा उपाय आहे. मी जर मुख्यमंत्री झालो तर या सर्व गोष्टी थांबवेन आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला स्थैर्य लाभेल असं त्यांनी शाह यांना सांगितले. त्यावर अमित शाह यांनी मुख्यमंत्री तर भाजपाचाच होईल असं सांगितले. त्यावर मी माझ्या गटासह भारतीय जनता पार्टीत विलिन व्हायला तयार आहे पण मला मुख्यमंत्री करा अशी मागणी शिंदेंनी शाहांकडे केली. इतके नैराश्य आलेला राजकारणी महाराष्ट्राच्या राजकारणात कधी पाहिला नाही. दिल्लीपुढे नाक घासणे, वारंवार झुकणे हे स्वत:ला बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार म्हणवतात, त्यांनी हे करणे महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे. मी जे सांगतोय ते १०० टक्के सत्य आहे. जर नसेल तर त्यांनी माझ्याशी एकतर्फी वाद करावा अशी टीका संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली. 

दरम्यान, शिंदेंच्या जवळच्या व्यक्तींवर भविष्यात नक्कीच कारवाया होणार आहेत. त्याचे पुरावे केंद्रीय तपास यंत्रणेच्या हाती लागलेत. यापुढे त्यांना वाचवणाऱ्या शक्ती दिल्लीत कमकुवत होताना दिसत आहे. शिंदेपेक्षा दिल्ली जास्त मला माहिती आहे. केंद्रीय तपास यंत्रणेच्या कामाची पद्धतही माहिती आहे. आयकर विभागाची नोटीस हा एक इशारा आहे. यापेक्षा काही वेगळ्या घडामोडी ऑगस्टमध्ये घडतील असे संकेत आहेत. या राज्याच्या राजकारणात त्यामुळे मोठी उलथापालथ घडतील. ज्या मंत्र्‍यांना आयकर विभागाची नोटीस पाठवली आहे त्यांचा एक व्हिडिओ माझ्याकडे आहे त्यात ते नोटांच्या बॅगेचे बंडल एकाबाजूला घेऊन बसलेले दिसतात. हे पुरावे सगळीकडे जात असतात. सरकारमध्ये आहात म्हणून कुणी हात लावणार नाही हा भ्रम असतो. कारवाईपासून कुणी वाचत नाही. भविष्यात या कारवाईला सामोरे जावे लागेल. सत्तेचे संरक्षण तात्पुरते असते. जसजसं तुमचे दिल्लीतील संरक्षक कमकुवत होतात अशावेळी तपास यंत्रणा फाईली उघडतात ते आता हळूहळू उघडत आहे असा दावाही संजय राऊतांनी केला. 

Web Title: "The group will merge with BJP, make me the Chief Minister"; Eknath Shinde's demand to Amit Shah, Sanjay Raut's sensational claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.