'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 18:38 IST2025-10-28T18:38:22+5:302025-10-28T18:38:51+5:30
Harshvardhan Sapkal Criticize Mahayuti Government: अतिवृष्टी व महापूरामुळे झालेल्या नुकसानीपोटी महायुती सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सरकारने जाहीर केलेले ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज हे फसवे आहे त्याचप्रमाणे आज मंत्रिमंडळ बैठकीत ११ हजार कोटी रुपयांच्या वितरणाला दिलेली मान्यताही फसवीच आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्षन सपकाळ यांनी केली आहे.

'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
मुंबई - अतिवृष्टी व महापूरामुळे झालेल्या नुकसानीपोटी महायुती सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सरकारने जाहीर केलेले ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज हे फसवे आहे त्याचप्रमाणे आज मंत्रिमंडळ बैठकीत ११ हजार कोटी रुपयांच्या वितरणाला दिलेली मान्यताही फसवीच आहे. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत असून हेक्टरी सरसकच ५० हजार रुपये दिले पाहिजे याचा पुनरुच्चार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
नांदेड येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा व महायुती सरकारवर तोफ डागली. लोकसभातील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत सपकाळ म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे मतांची चोरी करुन मुख्यमंत्री झाले आहेत जो माणूस स्वतः चोर मुख्यमंत्री (चो. मु.) आहे, चिप मुख्यमंत्री आहे म्हणून ते असेच चिप वक्तव्य करत आहेत. अशा पद्धतीने खालच्या पातळीवरच्या टीकेने राहुल गांधी यांचे नेतृत्व व कर्तृत्व कमी होत नाही, असे प्रत्युत्तर हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.
नांदेड हा काँग्रेस विचाराचा जिल्हा असून काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे तो नेत्यांचा पक्ष नाही. आजही नांदेड जिल्हा काँग्रेस विचाराचाच आहे व उद्याही काँग्रेस विचाराचाच राहिल. काँग्रेस पक्षात इतर पक्षातून येणाऱ्यांचा ओघ वाढत आहे. काल गडचिरोलीत आज नांदेड जिल्ह्यात तर उद्या जालना जिल्ह्यात पक्ष प्रवेश होत आहे. हा राहुल गांधी यांच्या संघर्षाचा परिणाम असून काँग्रेस विचारावर विश्वास ठेवून हे पक्ष प्रवेश होत आहेत याने पक्षाला बळ मिळत असून महाराष्ट्रात काँग्रेसला गतवैभव प्राप्त होतील असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विरोधकांचा सुपडासाफ करा, या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत त्यांचेच दात त्यांच्या घशात जातील असे सपकाळ म्हणाले.