संमेलनाध्यक्षांना मिळणारा निधी केला परत, डॉ. जयंत नारळीकरांच्या मोठेपणाचे घडले दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 13:27 IST2025-05-21T13:26:08+5:302025-05-21T13:27:14+5:30
पुण्यात २०१० साली झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर पुण्यभूषण फौंडेशनने ८३ लक्ष रुपयांचा निधी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे सुपूर्द केला. त्याच्या व्याजातून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना एक लक्ष रुपयांचा निधी ग्रामीण व दुर्गम भागातील विविध वाङ्मयीन उपक्रमांसाठी देण्याचा निर्णय महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आला होता.

संमेलनाध्यक्षांना मिळणारा निधी केला परत, डॉ. जयंत नारळीकरांच्या मोठेपणाचे घडले दर्शन
पुणे : ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असताना डॉ. जयंत नारळीकर यांच्या मोठेपणाचे दर्शन साहित्यविश्वाला घडले. संमेलनाध्यक्षांना मिळणारा १ लाख रुपयांचा निधी डॉ. नारळीकर यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला परत केला. तो निधी तुम्ही इतर साहित्यिक उपक्रमांसाठी वापरा. ग्रामीण भागातील संस्थांना ऑनलाइन कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सांगा. मी त्यासाठी जरूर उपस्थित राहीन. अशा अनेक कार्यक्रमांना डॉ. नारळीकर उपस्थित राहिले असल्याची आठवण साहित्य महामंडळाचे अध्यक्ष व साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितली.
पुण्यात २०१० साली झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर पुण्यभूषण फौंडेशनने ८३ लक्ष रुपयांचा निधी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे सुपूर्द केला. त्याच्या व्याजातून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना एक लक्ष रुपयांचा निधी ग्रामीण व दुर्गम भागातील विविध वाङ्मयीन उपक्रमांसाठी देण्याचा निर्णय महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आला होता. प्रतिवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात हा निधी संमेलनाध्यक्षांना देण्यात येत होता. ग्रामीण आणि दुर्गम भागातील वाङ्मयीन चळवळींना बळ देण्यासाठी तसेच तिथल्या साहित्यसंस्था व ग्रंथालये यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहताना मानधन, प्रवास - निवासाच्या खर्चाचा भार तिथल्या आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या संस्थांवर व संयोजकांवर पडू नये, हा निधी देण्यामागचा हेतू होता.
नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला डॉ. जयंत नारळीकर प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना एक लक्ष रुपयांचा धनादेश दिला. तो तत्काळ मला परत देत डॉ. नारळीकर म्हणाले, ‘कोरोनाच्या संकट काळात कार्यक्रमांवर असलेल्या बंधनांमुळे तसेच प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रवास करून कार्यक्रमांना उपस्थित राहणे शक्य नसल्याने हा निधी महाराष्ट्र साहित्य परिषदेला परत करत आहे, असे प्रा. जोशी यांनी सांगितले.