आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत तुटपुंजी; व्यापक लढा उभारणार, राजू शेट्टी यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 12:49 IST2026-04-01T12:48:34+5:302026-04-01T12:49:50+5:30

देवगड येथे चार एप्रिलला बागायतदारांचा मेळावा

The financial assistance of Rs 22000 per hectare announced by the state government for mango and cashew farmers is meager Raju Shetty warns of mounting a massive fight | आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत तुटपुंजी; व्यापक लढा उभारणार, राजू शेट्टी यांचा इशारा

आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत तुटपुंजी; व्यापक लढा उभारणार, राजू शेट्टी यांचा इशारा

रत्नागिरी : राज्य सरकारने आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली हेक्टरी २२ हजार रुपयांची आर्थिक मदत तुटपुंजी आहे. या मदतीतून शेतकरी सावरणार नसल्याने आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचा उद्रेक दाखविण्यासाठी एकदिलाने व्यापक लढा उभारण्याचा निर्णय रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आला. त्यासाठी मुंबई येथे आंदोलन केले जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून ४ एप्रिलला देवगड येथे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतदारांचा मेळावा होणार आहे.

एका बाजूला औषध फवारणी, खते, मजुरी आणि वाहतुकीचा खर्च लाखांच्या घरात गेला असताना, सरकार केवळ २२ हजार रुपये देऊन शेतकऱ्यांचे समाधान करू पाहत आहे. एका आंबा बागेचा वार्षिक खर्च आणि झालेली हानी पाहता, ही रक्कम फवारणीच्या एका हप्त्यासाठीही पुरेशी नाही. वारंवार होणाऱ्या नुकसानामुळे कोकणचा शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. अशा परिस्थितीत सरकारने जाहीर केलेली ही मदत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरली आहे.

राजकारणापलीकडे कोकणातील लोकप्रतिनिधींनी आंबा व काजू बागायतदार यांच्या प्रश्नावर मौन पाळले आहे. आंबा व काजू पीकविमा कंपन्याकडून शेतकऱ्यांना लुबाडले जात आहे. कर्जमाफीमध्येही निकष व अटी घालून शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवले जात आहे. यामुळे मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर व ठाणे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सहभागी करून घेतले जाणार आहे.

यावेळी ४ एप्रिल रोजी देवगड येथे होणाऱ्या शेतकरी मेळावा होणार असून, त्यासाठी शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी खासदार शेट्टी यांनी केले. या बैठकीसाठी माजी आमदार बाळ माने, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक सुशांत नाईक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर, विनायक कदम, प्रकाश साळवी यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख आंबा बागायतदार शेतकरी उपस्थित होते.

Web Title : सरकारी सहायता अपर्याप्त; व्यापक आंदोलन होगा: राजू शेट्टी की चेतावनी

Web Summary : राजू शेट्टी ने आम और काजू किसानों के लिए अपर्याप्त सहायता के खिलाफ आंदोलन की चेतावनी दी। किसान कर्ज और फसल बीमा शोषण से परेशान हैं। 4 अप्रैल को देवगढ़ में रत्नागिरी, सिंधुदुर्ग और अन्य जिलों के किसानों को जुटाने के लिए एक बैठक आयोजित की जाएगी, जिसके बाद मुंबई में विरोध प्रदर्शन किया जाएगा।

Web Title : Inadequate government aid; widespread agitation will be started: Raju Shetti's warning

Web Summary : Raju Shetti warns of agitation against insufficient aid for mango, cashew farmers. Farmers are burdened by debt and crop insurance exploitation. A meeting is planned in Devgad on April 4 to mobilize farmers from Ratnagiri, Sindhudurg, and other districts for a Mumbai protest.