आंतरजातीय विवाहबाबत हाकेंनी केलेल्या वक्तव्यावर कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने दिलं प्रत्युत्तर, काय म्हटलं.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 18:09 IST2025-09-16T18:06:31+5:302025-09-16T18:09:28+5:30

हाके यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवींचाही विसर पडला

The entire Maratha community in Kolhapur responded to the inter caste marriage performed by the Laxman Hakes | आंतरजातीय विवाहबाबत हाकेंनी केलेल्या वक्तव्यावर कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने दिलं प्रत्युत्तर, काय म्हटलं.. वाचा

आंतरजातीय विवाहबाबत हाकेंनी केलेल्या वक्तव्यावर कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने दिलं प्रत्युत्तर, काय म्हटलं.. वाचा

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी शंभर वर्षांपूर्वी धनगर-मराठा आंतरजातीय विवाहाची नुसती संकल्पना मांडली नाही तर आपल्या बहिणीचा विवाह होळकर घराण्यात करून नाते संबंध जोडताना मराठा-धनगर शंभर विवाहाची घोषणा केली. त्यामुळे लक्ष्मण हाके यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये, या शब्दांत कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने पत्रकाद्वारे प्रत्युत्तर दिले.

मराठा समाज आता ओबीसीमध्ये आलाय म्हणतोय. मागासलेपणाचे त्यांना डोहाळे लागलेत तर त्यांच्या ११ मुलींचे विवाह आमच्या मुलांसोबत लावा असे वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी नुकतेच केले होते. त्याला कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने प्रत्युत्तर दिले. पत्रकात म्हटले आहे की, शिवरायांनी महिलांचा नेहमीच सन्मान केला आहे. त्यांच्या महाराष्ट्रात महिला मुली व बहिणीचा अपमान सहन केला जाणार नाही. हाके यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवींचाही विसर पडला आहे.

राष्ट्राची प्रगती होण्यासाठी जातीअंताच्या लढा व आर्थिक उन्नती हा एकच उपाय आहे असे समजणारे राष्ट्रीयत्वाची संकल्पना घेऊन शाहू महाराजांनी सामाजिक समतेचा पाया आपल्या संस्थानात घातला. आजही सामाजिकदृष्ट्या सलोख्याची विण तुटू नये यासाठी कोल्हापूरकर नेहमीच अग्रेसर असतात. महाराष्ट्रात १२ बलुतेदार आणि मराठा यांच्यात तेढ निर्माण होऊन आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी हाके यांच्यासारखे मुद्दाम वक्तव्य करून तेढ करीत आहेत.

परंतु, सुजाण समाजाला यामागचा बोलविता धनी वेगळा आहे हे माहीत आहे. त्यामुळे कितीही भडकावू वक्तव्य केली तरी तेढ निर्माण होणार नाही. शाहू महाराजांनी मराठ्यांसह सर्व बहुजनांना आरक्षण दिले होते. यामुळे राजर्षी शाहूंची सामाजिक सलोख्याची विण तुटणार नाही या शब्दांत सकल मराठा समाजाने भूमिका मांडली.

या पत्रकावर सकल मराठा समाजाचे समन्वयक वसंतराव मुळीक, चंद्रकांत पाटील, शशिकांत पाटील, संजयकाका जाधव, राजू सावंत, उमेश पोवार, दिलीप सावंत, राहुल इंगवले, रुपेश पाटील यांच्या सह्या आहेत.

Web Title: The entire Maratha community in Kolhapur responded to the inter caste marriage performed by the Laxman Hakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.