मुंबई - शिंदेसेनेच्या मंत्र्यांच्या नाराजीचे पडसाद मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. विषय पत्रिकेवरील विषय संपल्यानंतर सर्व सचिवांना बैठकीबाहेर जाण्यास सांगून १५ मिनिटे बंद दाराआड याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मंत्रिमंडळातील समावेश आणि खातेवाटवावरून शिंदेसेनेत नाराजी असून त्याबाबतची खदखदही वेळोवेळी व्यक्त होत होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक शासकीय बैठकांना गैरहजर राहून एकप्रकारे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी खात्यात होणाऱ्या हस्तक्षेपाबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. या सर्वांचे पडसाद या बैठकीत उमटले. तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणावर एकनाथ शिंदेंची नियुक्ती न झाल्याबाबतची चर्चा झाली.
मंत्र्यांच्या खात्यांमध्ये होणाऱ्या हस्तक्षेपाबाबत शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते. विशेषतः उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विभागाचे प्रधान सचिव आणि एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याबाबत नाराजी व्यक्त केल्याचे समजते. रायगड व नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून सुरू असलेला तिढाही संपलेला नाही. याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.
जिल्हा पालक सचिवांवर मुख्यमंत्री फडणवीस नाराजजिल्ह्याच्या विकासावर प्रशासनाची देखरेख असावी या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक जिल्ह्यासाठी पालकमंत्र्यांप्रमाणेच पालक सचिव नियुक्त केले आहेत. मात्र, अनेक पालक सचिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत पालक सचिवांवर नाराजी व्यक्त केली. मुख्य सचिव सुजाता सौनिक या ठाणे जिल्ह्याच्या पालक सचिव असून त्यांनी जिल्ह्याचा दौरा केला आहे.मग इतर पालक सचिव जिल्हा दौऱ्यावर का जात नाहीत, अशी विचारणा मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच पालक सचिवांनी नियमित नियुक्त केलेल्या जिल्ह्यात जावे असे निर्देशही दिल्याचे सूत्रांनी सांगितले.