महाराष्ट्र-कर्नाटकात डिझेल दरामध्ये आता काही पैशांचाच फरक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 17:16 IST2025-07-14T17:12:24+5:302025-07-14T17:16:32+5:30
कर्नाटकाने केलेल्या दरवाढीचा परिणाम

महाराष्ट्र-कर्नाटकात डिझेल दरामध्ये आता काही पैशांचाच फरक
जे. एस. शेख
कागल : गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र - कर्नाटक सीमा भागात महामार्गालगत असलेल्या पेट्रोल व डिझेल पंपांवर कर्नाटक हद्दीत ‘महाराष्ट्र से सस्ता पेट्रोल - डिझेल’ असे फलक झळकत होते. मात्र, एप्रिल २०२५ पासून महाराष्ट्रातील डिझेलचे दर कमी झाल्याने ‘कर्नाटक से सस्ता डिझेल’ असे दर महाराष्ट्रातील पंपांवर झळकत आहेत.
सध्या कर्नाटकपेक्षा महाराष्ट्रात डिझेल कागल - कोगनोळीजवळ फक्त ५९ पैसे इतके स्वस्त आहे, तर पेट्रोल कर्नाटकपेक्षा १ रुपया महाग आहे. लोकप्रिय आर्थिक योजनांच्या पूर्तीसाठी कर्नाटक सरकारने कर वाढवल्याने पेट्रोल पंपांवरील विक्रीचा टक्का घटल्याचा आरोप केला जात आहे.
महाराष्ट्र हद्दीतील पंपचालकांनी डिझेल दरामध्ये काही पैशांचाच फरक असल्याने विक्रीत फार फरक झाला नसल्याचे सांगितले. तसेच अनेक ट्रान्सपोर्ट कंपन्यांनी ठराविक पेट्रोल पंपांवर खाती उघडलेली असतात. त्यामुळे ते कमी-जास्त दराकडे फारसे लक्ष देत नाहीत, असे स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील दर स्थिरच..
महाराष्ट्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर कमी केलेले नाहीत, तर कर्नाटक सरकारने गेल्या काही वर्षात हे दर वाढवत नेले आहेत. आठ वर्षांपूर्वी कर्नाटकात डिझेल दहा रुपयांनी स्वस्त होते. नंतर ते सात रुपये, पाच रुपये, दोन रुपये असे कमी होत गेले.
डेपोमधील अंतरावर ठरतो दर
महाराष्ट्रातील डिझेल-पेट्रोलचा साठा मिरज येथे आहे, तर कर्नाटकात हा डेपो देसुर - बेळगाव येथे आहे. येथून पेट्रोल पंपापर्यंतच्या वाहतुकीच्या खर्चावर काही पैशांत हा दर कमी-जास्त होतो. उदाहरणार्थ कोगनोळीपेक्षा बेळगावात पेट्रोल एक रुपयांनी स्वस्त मिळते.
ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न
सीमा भागातील या पेट्रोल - डिझेल पंपावर वाहनधारकांना विविध सेवासुविधा दिल्या जातात. यामध्ये डिस्काऊंट, बक्षीस कुपन, पाणी बाटली, काही भेटवस्तू यांचा समावेश आहे.
विक्री कमी-जास्त
ज्या पंपावर वाहनमालक व ट्रान्सपोर्ट कंपन्यांनी खाते उघडले आहे, तेथे दिवसाला पन्नास हजारहून अधिक डिझेल विक्री होते. ज्या पंपावर खाते नाही, तेथे ही विक्री दोन हजार लिटरपर्यंत होते.