"महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; तोपर्यंत सर्वांनी सबुरीने घ्या!"
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 10:01 IST2025-10-18T10:00:25+5:302025-10-18T10:01:01+5:30
स्वबळाची भाषा करणाऱ्या नाईक, केळकर यांना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कानपिचक्या

"महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; तोपर्यंत सर्वांनी सबुरीने घ्या!"
ठाणे : महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. निवडणुकीला अजून दोन महिने शिल्लक आहेत. तोपर्यंत सबुरीने घ्या, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंत्री गणेश नाईक, आ. संजय केळकर यांना कानपिचक्या दिल्या आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात भाजप स्वबळावर महापालिका निवडणूक लढवणार, असा दावा मंत्री गणेश नाईक व आ. संजय केळकर करीत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपच्या पक्ष कार्यालयात शुक्रवारी आयोजित बैठकीत रवींद्र चव्हाण यांनी भाजप नेत्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक सल्ले दिले.
महायुतीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या पातळीवर होईल, असे रवींद्र चव्हाण म्हणाले, तर चव्हाण यांच्या या इशाऱ्यानंतर नाईक यांनी फार मोठे सांगण्यासारखे आहे. मात्र, आता नंतर केव्हा तरी सांगेन, असे सांगत काढता पाय घेतला. ठाण्यातील भाजपच्या पक्ष कार्यालयात शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या कोकण विभागीय बैठकीनंतर रवींद्र चव्हाण पत्रकारांशी बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिंदेसेनेच्या स्थानिक पातळीवर बैठका होत आहेत. शिंदेसेनेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी भाजप नेत्यांच्या विरोधात नाराजीचा सूर लावला. गुरुवारी शिंदेसेनेने आक्रमक पवित्रा घेतला, तर अजित पवार गटाच्या नेत्यांनीही स्वबळाची भाषा केली. या पार्श्वभूमीवर महायुतीत बेबनाव निर्माण होऊ नये, याकरिता प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी आपल्या नेत्यांना सबुरीचा सल्ला दिला. याप्रकरणी आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
कार्यकर्त्यांची बैठक घेणार
पुढील दोन महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या दृष्टीने कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आता दिवाळी सुरू होत आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी सुटीच्या मूडमध्ये आहेत, त्यांना आगामी निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागा, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
निवडणुका लढताना त्या-त्या ठिकाणच्या आरक्षणांचा विचार केला जातो, त्या आरक्षणांची कागदपत्रे गोळा करणे ही जबाबदारी स्थानिक पदाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. तसेच, उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी समिती स्थापन केली आहे.
स्वबळाच्या मागणीला ब्रेक लागल्याची चर्चा
भाजपच्या कार्यकर्त्याने निवडणूक लढण्यासाठी पूर्वतयारी करावी. त्याचा फायदा नेहमी महायुतीला होतो. स्वबळाच्या कार्यकर्त्यांच्या मागणीला चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे काहीसा ब्रेक लागला. महापालिकेच्या निवडणुका अंतिम टप्प्यात होणार आहेत. तत्पूर्वी, होणाऱ्या नगरपालिका, जि.प. निवडणुकीवर महायुतीमधील वादांचा विपरीत परिणाम होऊ
नये, याकरिता चव्हाण यांनी हे वक्तव्य केल्याची शक्यता नाकारता येत नाही.
घरच्यांना तिकीट मागण्यापेक्षा नव्या तरुणांना संधी द्या
ठाणे महापालिका निवडणुकीत पत्नी, मुलगी किंवा मुलगा यांना तिकीट मागण्यापेक्षा नव्या तरुणांना संधी द्या, अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय संघटनमंत्री शिवप्रकाश यांनी माजी नगरसेवकांची शुक्रवारी कानउघाडणी केली. नव्या तरुणांना संधी दिली नाही, तर पक्ष संघटना वाढणार कशी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला, अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली.
ठाण्यातील भाजपच्या पक्ष कार्यालयात कोकण विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक, राष्ट्रीय संघटनमंत्री शिवप्रकाश, माधवी नाईक, आ. संजय केळकर, निरंजन डावखरे, शहराध्यक्ष संदीप लेले, माजी शहराध्यक्ष संजय वाघुले यांच्यासह कोकण विभागातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध मुद्द्यांप्रकरणी मार्गदर्शन आणि चर्चा करण्यात आली.