महापुराचे संकट ओसरत नाही तोच वेढा पुन्हा घट्ट, मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाने पुराचे संकट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 12:37 IST2025-09-28T12:35:42+5:302025-09-28T12:37:44+5:30
मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाने पुराचे संकट, घरे-शिवारं पुन्हा पाण्यात गेल्याने नुकसान, शेकडो नागरिक अडकल्याने बचावकार्य, पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांच्या पातळीत वाढ, प्रकल्पांमधून विसर्ग वाढविल्याने ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा

महापुराचे संकट ओसरत नाही तोच वेढा पुन्हा घट्ट, मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाने पुराचे संकट!
मुंबई : सततच्या पावसामुळे निर्माण झालेल्या अस्मानी संकटावर मुसळधार पावसाने पुन्हा घाव घातला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून शनिवारी दिवसभर विविध जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्हा वगळता मराठवाड्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. तर विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील जिल्ह्यांनाही या पावसाने मोठा तडाखा दिला. त्यामुळे प्रकल्पांमधून विसर्ग वाढविण्यात आला. परिणामी प्रमुख नद्यांना पूर आले आहेत. गावागावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. पुरांचे वेढे पडल्याने नागरिक अडकून पडले. रस्ते-घरे पाण्याखाली गेली आहेत. मराठवाड्यात दिवसभर बचाव पथकांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले.
लातूर जिल्ह्यात मांजरा, निम्न तेरणा, तावरजा मध्यम प्रकल्पाची दारे उचलण्यात आल्यामुळे नद्यांच्या पात्रांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. परिणामी नदीकाठच्या जमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
राज्यातील ४५ धरणे १०० टक्के
आठवडाभरातील सततच्या मुसळधार पावसामुळे राज्यातील महत्वाच्या ५१ धरणांपैकी तब्बल ४५ धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे ३६ धरणांमधून विसर्ग सुरू असल्याने नद्यांना पूर आला आहे. रविवारी अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे नदी आणि नाल्याकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मराठवाडा पुन्हा जलमय
परभणी : शनिवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस. २१ मंडळांत अतिवृष्टी. जनजीवन विस्कळीत. घरांमध्ये पाणी. गोदावरी नदीचे पाणी पुलावरून वाहू लागल्याने नांदेड-पूर्णा राज्य महामार्गावर बंद. नद्यांना पूर.
हिंगोली : पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. कुपटी शिवारात (ता. कळमनुरी) तलाव फुटल्याने शेतात पाणीच पाणी. नऊ जनावरे दगावली. कुरुंदा (ता. वसमत) येथे पुरात अडकलेल्या
५० जणांना बाहेर काढले.
जालना : विविध भागात सकाळपासूनच पाऊस, शेतकऱ्यांची चिंता वाढली.
नांदेड : पुराचे पाणी ओसरत नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या, मुसळधार पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले, नांदेड-बीदर राष्ट्रीय महामार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक प्रभावित.
विदर्भाला जोरदार तडाखा
यवतमाळ : ११ महसूल मंडळांत अतिवृष्टी. अनेक गावांचा संपर्क तुटला. पुराच्या पाण्यात वृद्ध गेला वाहून.
गडचिरोली : जिल्ह्यात तीन दिवसांपासून संततधार, वादळी पावसामुळे धान पीक जमिनीवर कोसळत असल्याने नुकसान.
भंडारा : मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीला पूर, गोसेखुर्दचे १५ गेट उघडले.
गोंदिया : २० हजार हेक्टरवरील धानपिकाचे नुकसान, नदीकाठच्या ९६ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात
चंद्रपूर : जिल्ह्यात पावसाचा जोर, अनेक वस्त्यांमध्ये पाणी; शेतपिकांचे मोठे नुकसान, जनजीवन विस्कळीत
अकोला : धुवाधार पावसाला सुरुवात झाली. नाल्यात एक जण गेला वाहून. पिके जमीनदोस्त.
वाशिम : जिल्ह्यातील सहाही तालुक्यांत शेतशिवार जलमय झाले.
धाराशिव : १५०० जणांचे स्थलांतर, शाळा कोसळली
धाराशिव : जिल्ह्याला पावसाने पुन्हा झोडपून काढले. शुक्रवार व शनिवारच्या रात्रीतून जिल्ह्यातील तब्बल १८ मंडळांत अतिवृष्टी झाली. पुन्हा भूम व परंडा तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला असून, सीना-कोळेगाव धरणातील विसर्ग वाढवल्याने नदीकाठचा परिसर पाण्याखाली गेला आहे. परंडा तालुक्यात दीड हजार नागरिकांचे स्थलांतर केले. धाराशिव तालुक्यात लासोना येथील जिल्हा परिषद शाळाही मध्यरात्री कोसळून पडली.
तुळजाभवानी संस्थानकडून पूरग्रस्तांना १ कोटी रुपयांची मदत : तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून पूरग्रस्तांसाठी १ कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जमा करण्याचा निर्णय शनिवारी जाहीर करण्यात आला. तसेच १ हजार साड्यांचे तातडीने वाटप सुरू करण्यात आले.
कोकण, पश्चिम महाराष्ट्रात वाढला जोर, नद्यांना आले पूर
कोल्हापूर : शनिवारी सकाळपासून जोर वाढला. वारणा, राधानगरी, दुधगंगा धरणांतून विसर्ग वाढविण्यात आला. पंचगंगेच्या पातळीत दीड फुटाने वाढ.
सांगली : शुक्रवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस, ओढ्या-नाल्यांना पूर, रस्ते वाहतुकीसाठी बंद, घरांमध्ये शिरले पाणी, कोयना आणि वारणा धरणातून विसर्ग सुरू.
सातारा : शनिवारी धुवाधार पावसाचा कहर, दुष्काळी माण, खटाव, फलटण तालुक्यांत दाणादाण, ‘माणगंगा’ने धोक्याची पातळी ओलांडली, येरळा नदीलाही पूर.
रत्नागिरी : जिल्ह्याच्या विविध भागात होत असलेल्या संततधार पावसामुळे पिके धोक्यात. खरीप हंगामातील भातशेती आडवी झाल्याने शेतकरी चिंतातूर.
सिंधुदुर्ग : कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यांत रिपरिप सुरू.
पंढरपूर : चंद्रभागेतील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पाण्याचा वेढा कायम.
४५ गावांचा संपर्क तुटला, १४३ घरे पडली
बीड : आठ दिवसांपूर्वी २९ मंडळांत झालेल्या अतिवृष्टीच्या तडाख्यातून सावरत नाही, तोच शुक्रवारी रात्री साडेबारा वाजेपासून शनिवारी दुपारपर्यंत जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. केज तालुक्यात ४५ गावांचा संपर्क तुटला असून, १४३ घरे पडली. माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथे पुरामध्ये अडकलेल्या ७ नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ पथक तातडीने पोहोचले आहे. केज, माजलगाव, परळी वैजनाथ, अंबाजोगाई तालुक्यांत अनेक गावांचा संपर्क तुटला. अनेक ठिकाणी दळणवळण ठप्प झाले. अंबाजोगाईतील मुडेगाव येथे वाड्याची भिंत कोसळल्याने एक जण जखमी झाला. बिंदुसराच्या पात्रात पाण्याचा प्रवाह वाढल्याने नवा पुलाला पाण्याचा स्पर्श झाला.
बांधावर जायची गरज नाही; तत्काळ पंचनामे करा : भरणे
माढा (सोलापूर) : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी कुठल्याही निकष व अटीत न राहता तत्काळ पंचनामे करून याबाबतचा अहवाल सादर करा. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर पंचनामे करायला जायची गरज नाही. जे आपल्याला दिसतंय त्याप्रमाणे पंचनामे करा. शेतकऱ्यांचा गुंठ्याचाही पंचनामे ठेवायचा नाही. याबाबतचे आदेश देऊन शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत देणार असल्याची घोषणा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी केली. माढा तालुक्यातील उंदरगाव येथे झालेल्या अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी ते आले होते.