लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/नाशिक : मराठीच्या मुद्यावरून उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येऊन नऊ दिवस लोटले तरी दोघांनी एकत्र येण्याबाबत कोणतीही घोषणा अद्याप होऊ शकलेली नाही. ‘एकत्र आलो आहोत, एकत्र येण्यासाठी’ असे जाहीरपणे म्हणणारे उद्धव ठाकरे यांनी आता मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तर जाहीर होऊ द्या मग पाहू असा पवित्रा घेतला आहे. राज ठाकरे यांनी या मुद्यावर मौन बाळगले.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्षाच्या तीन दिवसांच्या शिबिरासाठी इगतपुरी येथे आहेत. तेथे दोन भावांच्या एकत्र येण्याविषयी त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करण्याचे टाळले. ‘मराठीच्या समर्थनार्थ व्यासपीठावर आम्ही एकत्र आलो होतो. मुंबईत झालेला मेळावा फक्त मराठी भाषेसाठी आणि जनतेच्या भावना व्यक्त करण्यासाठी होता, असे त्यांनी सांगितले.
शिबिरात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना राज हे उद्धव यांच्याविषयी आणि एकत्र येण्याविषयी काय बोलतात याबाबत उत्सुकता आहे. राज यांनी मराठीच्या मुद्द्याचे जोरदार समर्थन करत मराठी शाळा वाचवायच्या असतील तर महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा ही सेमी इंग्लिश झाली पाहिजे, असे सांगितले.
निवडक पदाधिकाऱ्यांशी राज यांची चर्चा
राज ठाकरे यांनी ऐक्याबाबत सावध भूमिका घेतली असल्याचे त्यांच्या आजच्या विधानावरून स्पष्ट झाले. शिबिरासाठी इगतपुरीच्या रिसॉर्टवर पोहोचल्यानंतर निवडक पदाधिकाऱ्यांशी राज यांनी चर्चा केली. शिबिरात कोणत्या मुद्यांवर भर द्यायला हवा यावर त्यांनी मते जाणून घेतली.
मराठी विजय मेळाव्यात उद्धव ठाकरे हे दोघांनी एकत्र येण्याविषयी अतिशय सकारात्मक बोलले होते, पण राज यांनी थेट कोणतेही भाष्य केले नव्हते. तसेच, या मुद्यावर आपल्या पक्षाच्या कोणत्याही नेत्याने आपण सांगितल्याशिवाय बोलू नये, असे आदेशही दिले होते.
प्रसंगी एकटे लढू : नांदगावकरइगतपुरीतील शिबिरासाठी मनसेचे नेते तथा माजी आमदार बाळा नांदगावकरही दाखल झाले आहेत. त्यांनाही पत्रकारांनी उद्धवसेना व मनसे एकत्र येणार का, असा प्रश्न केला. ते म्हणाले, गरज पडल्यास एकटे लढू. तशी आमची तयारी आहे.
निवडणुका तर जाहीर होऊ द्या : उद्धवनांदगावकर यांच्या विधानाबाबत विधानभवनात पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना विचारले असता ‘या ऐक्याविषयी आपल्या पक्षातील कोणीही बोलू नये असे आदेश त्यांच्या नेत्यांनी (राज) दिले आहेत’ अशी आठवण उद्धव यांनी करून दिली. आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तर जाहीर होऊ द्या मग पाहू’ असे ते म्हणाले.
इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उद्धव आग्रही : लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची बैठक झालेली नाही. बिहार निवडणूक, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ती व्हायला हवी, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत ऑगस्टमध्ये सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह दुसऱ्यास कुणाला देणे हा निवडणूक आयोगाचा अधिकार नव्हता. आमची शेवटची आशा आता सर्वोच्च न्यायालयच आहे असे ते म्हणाले.