शिवसेनेच्या चिन्हासंदर्भात सुनावणीत ठाकरे सेनेच्या वकिलांनी 'हा' मुद्दा मांडायला हवा होता - पृथ्वीराज चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 17:23 IST2025-11-20T17:21:21+5:302025-11-20T17:23:45+5:30
भाजपने ७३ आणि ७४ वी घटनादुरुस्ती पूर्णता मोडून काढली

शिवसेनेच्या चिन्हासंदर्भात सुनावणीत ठाकरे सेनेच्या वकिलांनी 'हा' मुद्दा मांडायला हवा होता - पृथ्वीराज चव्हाण
कराड : गत चार दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या चिन्हासंदर्भात सुनावणी झाली. त्यावेळी युक्तिवादात ठाकरे सेनेच्या वकिलांनी मुद्दा मांडला. त्यावर तुमचा युक्तिवाद आम्ही जानेवारीत ऐकतो, आता वेळ नाही, असे सांगितले गेले. त्यावर स्थानिक निवडणुका गेली १० वर्षे झालेल्या नाहीत, असा मुद्दा ठाकरे गटाच्या वकिलांनी मांडायला पाहिजे होता, असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
कराड येथे पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीबद्दल भाष्य केले. चव्हाण म्हणाले, ठाकरे गटाच्या वकिलांनी चुकीचा युक्तिवाद केला आणि एका मिनिटात कामकाज संपलं. चिन्हाच्या संदर्भातील युक्तिवाद आम्ही जानेवारीत ऐकतो आता वेळ नाही. निवडणुका हे राजकीय पक्षाचे कामच आहे. त्यासाठी तयार असायला पाहिजे. त्यामुळे निवडणुका होत राहतील, असे न्यायमूर्ती म्हणाले. त्यामुळे ठाकरे गटाचे वकील गप्प बसले.
प्रत्येक नागरिक २ निवडणुका लढतो. एक केंद्रीय आणि दुसरी स्थानिक. गेली १० वर्ष स्थानिक निवडणुकाच झालेल्या नाहीत, हा मुद्दा त्यांनी मांडायला पाहिजे होता. मात्र, तो मांडायला ते चुकले.
भाजपने ७३ आणि ७४ वी घटनादुरुस्ती पूर्णता मोडून काढली आहे. त्यामुळे लोकांना आपला नगरसेवक, पंचायत समिती सदस्य निवडायचा अधिकार राहिलेला नाही. हा वेगळा विषय आहे. त्याकरिता आम्हाला चिन्हाचा निर्णय स्थानिक निवडणुका होण्यापूर्वी द्या, अशी बाजू ठाकरे गटाच्या वकिलांनी मांडायला पाहिजे होती. मात्र, ती मांडली गेली नाही. आता ती मांडली गेली तरी चालेल. १० वर्षे निवडणुका झालेल्या नाहीत. ही महत्त्वाची बाब त्यांनी न्यायालयात का सांगितली नाही, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.