“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 12:25 IST2025-10-09T12:22:15+5:302025-10-09T12:25:07+5:30
Thackeray Group News: योगेश कदम यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. तात्काळ गृहराज्यमंत्री पदाचा राजीनामा द्या, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे.

“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
Thackeray Group News: कोथरुड गोळीबाराप्रकरणी मकोका कारवाईनंतर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला कुख्यात गुंड निलेश घायवळ हा परदेशात पसार झाला. त्याचा भाऊ सचिन घायवळ याला बंदुकीचा परवाना मिळाल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना दिल्याची माहिती समोर आली आहे. यावरून ठाकरे गटाने योगेश कदम यांच्यावर टीका करत तत्काळ राजीनामा देण्याची मागणी केली आहे.
शिक्षक व व्यावसायिक सचिन घायवळ यांनी माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवाना अपील प्रकरणात, पोलिस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार, सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते. उपलब्ध कागदपत्रे आणि मा. न्यायालयाच्या न्यायनिर्णयाने निर्दोष मुक्त केल्याच्या आदेशाचे अवलोकन करून, नियमानुसार सदर प्रकरणात आवश्यक ती कार्यवाही करण्यात आलेली आहे. म्हणूनच, सध्या चर्चेत असलेल्या अन्य प्रकरणाशी अपीला संदर्भात माझ्या नियमानुसार केलेल्या कारवाईला जोडणे हे पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहे, असे योगेश कदम यांनी एक्सवर पोस्ट करत सांगितले होते. यानंतर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक्सवर पोस्ट करत योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले
कुख्यात गुंड निलेश घायवळ चा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ शस्त्र परवाना प्रकरणांमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, शस्त्रपरवाना देत असताना कुठलाही गुन्हा दाखल नव्हता. सचिन घायवळ याच्यावर फक्त खुनाचा गुन्हा नाही तर मोक्का अंतर्गत सुद्धा गुन्हे दाखल होते. विशेष अशा व्यक्तीला शस्त्र परवाना दिला जाऊ नये असा पोलिसांचा अहवाल होता. तरीसुद्धा योगेश कदम यांनी स्वतःच्या अधिकार कक्षेमध्ये हा विशेष परवाना देऊ केला. योगेश कदम यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत एका गुंडाला अभय देण्याचा आणि त्याला बळ पुरवण्याचा प्रयत्न केला आहे सबब योगेश कदम तुम्हाला पदावर राहण्याचा अधिकार नाही तात्काळ गृहराज्यमंत्री पदाचा राजीनामा द्या, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कोथरूड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 118 /2010 भा द वि कलम 143 147 ,148, 149 , 307, 427, 428 सह शस्त्र अधिनियम 1959 मधील कलम 3 4 25 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 एक ,135 ,142 अन्वये गुन्हा दाखल आहे. दत्तवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 82 ऑब्लिक 2010 भारतीय दंड विधान कलम 120 व 302 , 307, 343, 147, 148 , 149 सह शस्त्र अधिनियम 1959 मधील कलम 3, 4, 25 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 1 सह 135 मोका कलम 3 (1)(१), 3 (1) (२) , 3(4) अन्वये गुन्हा दाखल आहे. शिवाजीनगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 3082/2025 महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
काल कुख्यात गुंड निलेश घायवळ चा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ शस्त्र परवाना प्रकरणांमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, शस्त्रपरवाना देत असताना कुठलाही गुन्हा दाखल नव्हता.
— SushmaTai Andhare (@andharesushama) October 9, 2025
सचिन घायवळ याच्यावर फक्त खुनाचा गुन्हा नाही तर मोक्का अंतर्गत सुद्धा गुन्हे दाखल होते. विशेष अशा… pic.twitter.com/8WA5lqh611