शरद पवारांच्या भेटीपूर्वी अजितदादा-जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा; संजय राऊत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 12:54 IST2025-03-22T12:53:43+5:302025-03-22T12:54:41+5:30
Thackeray Group Sanjay Raut News: एका बैठकीच्या निमित्ताने शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील एकत्र आले होते. यावर संजय राऊत यांनी खोचक शब्दांत भाष्य केले. तसेच आम्हाला सोडून गेलेल्यांच्या भेटीगाठी आम्ही टाळतो, असेही म्हटले आहे.

शरद पवारांच्या भेटीपूर्वी अजितदादा-जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा; संजय राऊत म्हणाले...
Thackeray Group Sanjay Raut News: बीड, परभणी प्रकरणावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. महायुती सरकारला घेरण्याचा जोरदार प्रयत्न केला. यानंतर औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा पुढे आला. नागपूर येथे मोठा हिंसाचार झाला. यावरूनही विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. यानंतर दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफीवरूनही महायुतीवर विरोधक टीका करताना पाहायला मिळत आहेत. यातच अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक झाली. ही बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या बैठकीत शरद पवार-अजित पवार एकत्र असणार होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी आणि त्यांना निवेदन देण्यासाठी गर्दी झाली होती. परंतु जयंत पाटील भेटण्यासाठी आल्यावर अजित पवार यांच्या कक्षात असलेल्या सर्व लोकांना बाहेर काढण्यात आले. सुरक्षा रक्षकांनाही बाहेर काढण्यात आले. अजित पवार यांच्या स्वीय सहायकांनाही बाहेर जाण्यास सांगण्यात आले. त्यानंतर बंद दाराआड चर्चा झाली, असे सांगितले जात आहे. यावरून आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मीडियाशी बोलताना संजय राऊत यांनी या मुद्द्यावर भाष्य केले.
भेटीगाठीसाठी आमच्याकडे ना शिक्षण संस्था, ना प्रतिष्ठान
त्यांचे उत्तम चाललेले असते. शिवसेनेतून आमचे काही लोक सोडून गेले. आम्ही त्यांच्या शक्यतो वाऱ्यालाही फिरकत नाही. ज्या पद्धतीने महाराष्ट्राशी त्यांनी बेईमानी केली, गद्दारी केली आणि महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला. आम्ही त्यांच्या आसपासही जाणार नाही. पण यांचे बरे असते, यांना एकत्र भेटण्यासाठी वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट असते, एकत्र भेटण्यासाठी विद्या प्रतिष्ठान असते, त्यांना सगळ्यांना एकत्र भेटण्यासाठी रयत शिक्षण संस्था असते. आमच्याकडे असे काहीही नाही. त्यामुळे आमच्या काही भेटीगाठी कुणाशी होत नाही आणि होण्याची वेळ आली तरी आम्ही टाळतो, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राजकारणामध्ये संवाद ठेवला पाहिजे वगैरे या गोष्टींवर आमचा विश्वास नाही. ज्यांनी आमचा पक्ष तोडला, महाराष्ट्राशी बेईमानी केली, महाराष्ट्र गुजराती व्यापाऱ्यांना विकण्याचा प्रयत्न केला, महाराष्ट्राच्या शत्रूसमोर गुडघे टेकले त्यांना आम्ही आमच्याकडे कितीही संधी असली तरी त्यांच्याशी संवाद ठेवणार नाही. आम्ही भांडत राहू, लढत राहू आणि धडा शिकवू, असा निर्धार संजय राऊत यांनी बोलून दाखवला.