सुरेश धस-धनंजय मुंडे भेटीवर संजय राऊंतांची बोचरी टीका; म्हणाले, “देव क्षमा करणार नाही”
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 13:39 IST2025-02-15T13:35:44+5:302025-02-15T13:39:03+5:30
Thackeray Group MP Sanjay Raut News: सुरेश धस, वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे एकच आहेत. हे विश्वासाघातापेक्षाही पुढचे पाऊल आहे, या शब्दांत संजय राऊतांनी संताप व्यक्त केला.

सुरेश धस-धनंजय मुंडे भेटीवर संजय राऊंतांची बोचरी टीका; म्हणाले, “देव क्षमा करणार नाही”
Thackeray Group MP Sanjay Raut News: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि बीड जिल्ह्यातील दहशतीवरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गेले काही दिवस सातत्याने जोरदार हल्लाबोल करणारे भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेटल्याचे समोर आल्याने वादळ निर्माण झाले. सुरेश धस यांच्या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदावर गदा येणार की काय, अशी परिस्थिती असताना व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधत या 'गळाभेटी'ची बातमी समोर आली. दुसरीकडे अजित पवार गटाने मुंडेंना पक्षाच्या कोअर ग्रुपमध्ये स्थान दिल्याचे जाहीर केले. राजकीय मंचावरील हे 'तुझ्या गळा, माझ्या गळा' प्रेमाचे नाट्य पाहून सर्वसामान्य नागरिकांनी तोंडात बोटे घातली. यावरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असून, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बोचरी टीका केली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या मध्यस्थीने ही भेट झाल्याचे सूतोवाच केले. तसेच चार-साडेचार तास आम्ही तिघे एकत्र होतो, असा गौप्यस्फोट केला. आम्ही काही वेळ एकत्र होतो. दोघांमध्ये मनभेद नाही; थोडे मतभेद आहेत, ते दूर होतील. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, माझ्याकडे दोघेही भेटले. मुंडे यांनी भाजपच्या प्रवासासोबत माझ्यासोबत काम केले आहे. आम्ही तिघेही परिवार म्हणून बसलो होतो, मी कोणालाही तडजोड करायला सांगितले नाही, असे बावनकुळेंनी सांगितले. यावरून प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.
देव क्षमा करणार नाही
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धस या लढ्याचे नेतृत्व करत आहेत, ते देशमुख कुटुंबीयांना न्याय देतील, असे वाटले होते. मला तेव्हा लोकांनी समजावले की, तुम्ही धसांची बाजू घेऊ नका. ते कधीही पलटी मारतील. धस आणि वाल्मीक कराड एकच आहेत. ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे. दुर्दैवाने हे सत्य होताना दिसत आहे. मला वाईट वाटत आहे. एका विद्यमान आमदाराने देशमुख कुटुंबीयांच्या अश्रूंचा बाजार मांडला. व्यापार केला. लोक सुरेश धसांच्या मागे न्यायासाठी धावत होते. सुरेश धस यांनी हे कृत्य केले असेल तर देव त्यांना क्षमा करणार नाही. असा खोटारडेपणा केला असेल आणि पाठीत खंजीर खुपसला असेल तर राज्याची जनता लक्षात ठेवेल. हे पाप आहे, त्याला क्षमा नाही. सुरेश धसांनी असे केले असेल तर विश्वासाघातापेक्षाही पुढचे पाऊल आहे, या शब्दांत संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला.
सुरेश धस, वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे एकच आहेत
बीडचे लोक वारंवार सांगत होते की, सुरेश धस, वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे एकच आहेत. नाण्याला दोन बाजू असतात. पण इथे तीन बाजू आहेत. पण मी विश्वास ठेवला नाही. तरी मला अपेक्षा आहे की, सुरेश धसांकडून असं कृत्य होणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.