Sanjay Raut News: संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेकून तोंडाला काळे फासले गेले. रविवारी दुपारी श्री फत्तेसिंह शिक्षण संस्था, सकल मराठा समाज यांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात हा प्रकार घडला. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. शाईफेक आणि धक्काबुक्कीमुळे गायकवाड कार्यक्रमाला हजेरी न लावता निघून गेले. छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल, भावना दुखावल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते संतप्त झाले होते. यानंतर आता या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली.
संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, भाजपचा संबंध आहे. ते जे आरोपी आहेत, सगळे भाजपा नेत्यांच्या आसपास असल्याचे व्हिडिओ आणि फोटो आले आहेत. महाराष्ट्रामध्ये डाव्या विचारसरणीवर दोषारोप करत आहात. डावी विचारसरणी अमुक आणि तमुक असे सांगत आहात. मग प्रवीण गायकवाड यांच्यावर ज्या पद्धतीने हल्ला झाला, हे भारतीय जनता पक्षाने पोसलेलेच डावे होते. आता या लोकांवर जनसुरक्षा कायदा लावणार आहात का? अशी विचारणा संजय राऊतांनी केली.
फडणवीसांच्या राज्यात महाराष्ट्राचे गुंड राष्ट्र झाले
महाराष्ट्रात कुठेही कोणीही कोणाला मारत आहे. सामाजिक कार्यकर्त्याला, राजकीय कार्यकर्त्याला बाहेर फिरायला भीती वाटत आहे. या भाजपाच्या गुंड टोळ्या कधी कोणावर हल्ला करतील, याचा भरवसा नाही. महाराष्ट्राचे गुंड राष्ट्र फडणवीस यांच्या राज्यात करून टाकले आहे, या शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला. आमच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यांवर पीएमएलए कायद्याअंतर्गत खोटे गुन्हे दाखल केले, बनावट पद्धतीने संबंध जोडले गेले. तोच जन सुरक्षा कायदा आहे, असा दावा संजय राऊतांनी यावेळी केला.
दरम्यान, सत्तेपुढे शहाणपण नसते. देवेंद्र फडणवीसांनी इतिहासाचा अभ्यास करावा. जगभरात डावी विचारसरणी आहे. सुभाषचंद्र बोस हे डाव्या विचारांना मानणारे होते, भगतसिंग कम्युनिस्ट होते. डाव्या विचारसरणीचे लोक देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात होते, तुम्ही किंवा तुमचा भाजप नव्हता. देवेंद्र फडणवीस अभ्यास करावा, अशी टीका संजय राऊतांनी केली.