“धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, अन्यथा गोठवा”; ठाकरे गटाच्या नेत्याची सुप्रीम कोर्टाला विनंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 13:49 IST2025-10-08T13:49:31+5:302025-10-08T13:49:53+5:30
Shiv Sena Thackeray Group News: शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी १ महिना पुढे ढकलण्यात आली आहे.

“धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, अन्यथा गोठवा”; ठाकरे गटाच्या नेत्याची सुप्रीम कोर्टाला विनंती
Shiv Sena Thackeray Group News: शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज अंतिम सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार होती. परंतु, ही सुनावणी १ महिना पुढे ढकलण्यात आली आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी १२ नोव्हेंबरला होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील काही महिन्यात पार पडतील. त्याआधीच खरी शिवसेना कुणाची हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने द्यावा, असा ठाकरे गटाचा प्रयत्न आहे. यातच पक्ष चिन्ह धनुष्यबाण एकतर आम्हाला द्या, नाही तर हे चिन्ह गोठवा, असे ठाकरे गटाच्या नेत्याने म्हटले आहे.
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या याचिकेत उद्धव ठाकरे यांच्या बाजूने कपिल सिब्बल बाजू मांडत आहेत. साधारणपणे जानेवारी महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील. त्यापूर्वी आम्हाला सुनावणी होणे आवश्य आहे. त्यामुळे शक्य तितक्या लवकरची तारीख द्यावी, जेणेकरून अंतिम युक्तिवाद पूर्ण होईल अशी मागणी केली. तर एकनाथ शिंदे यांच्या वकिलांकडून ही तारीख आणखी लांबवण्याचा प्रयत्न केला गेला. या प्रकरणी दोन्ही बाजूचे ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी १२ नोव्हेंबरची तारीख दिली.
धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, अन्यथा गोठवा
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली. प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यावेळी नारळ फोडला आणि नाव दिले. शिवसेना पक्ष त्यानंतर वाढत गेला. त्यानंतर झालेल्या मुंबई मनपा निवडणुकीत धनुष्यबाण निशाणी होती. लोकसभा, विधानसभेला धनुष्यबाण नव्हता. काही ठिकाणी वेगवेगळे चिन्ह दिले होते. नंतर हा धनुष्यबाण फिक्स झाला. बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विजयी झालो. हाच धनुष्यबाण निवडणूक आयोगाने कोणत्या निकषावर शिंदे गटाला दिला त्याचे मला आश्चर्य वाटते. त्यांनी शिवसेना फोडली आणि त्यांच्याकडेच ते पक्ष तसेच चिन्ह गेले ते योग्य नाही. धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, अन्यथा गोठवा, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली.
दरम्यान, मी देवाकडे प्रार्थना करेन की आमचा पक्ष चिन्ह आणि शिवसेना आम्हाला परत द्या. आम्ही धनुष्यबाणाची पूजा नेहमीच करत असतो. शिवसेनाप्रमुखांच्या मातोश्रीमध्ये धनुष्यबाण अजूनही ठेवलेला आहे आणि आणखी त्याची पूजा केली जाते, मग हा धनुष्यबाण ओरिजनल शिवसेनेला का मिळू नये, हे आमच्या सर्व शिवसैनिकांच्या आणि नागरिकांचे मागणे आहे, असे ते म्हणाले.