ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 15:14 IST2025-07-14T15:13:43+5:302025-07-14T15:14:40+5:30

Thackeray Group And BJP Group: शिवसेना शिंदे गटातील मोठ्या इन्कमिंगनंतर आता कोकणातील उद्धवसेनेच्या माजी नगराध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याचे म्हटले जात आहे.

thackeray group another major setback in malvan konkan 10 office bearers and former corporators join bjp | ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश

ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश

Thackeray Group And BJP Group: एकीकडे राज्यभरातील महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. तर, दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवरून आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाला लागलेली गळती अद्याप थांबताना दिसत नाही. ठाकरे गटाचे शेकडो पदाधिकारी, अनेक माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटात सामील झाले. यानंतर आता कोकणातील अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवक यांनी उद्धवसेनेला रामराम केला असून, भाजपामध्ये प्रवेश केला आहे. 

मालवण नगरपालिकेतील ठाकरे गटाच्या माजी नगराध्यक्षांसह १० प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवक, अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे ठाकरे गटाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे. भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष आणि कोकणातील मोठे नेते रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पक्षप्रवेश झाले. 

भाजपामध्ये प्रवेश का केला?

खऱ्या अर्थाने अडीच वर्षांत रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले. त्यांनी जे काम केले, त्यामध्ये आम्हाला कधीच विरोधी पक्षाची वागणूक दिली नाही. मालवण शहर हे पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. त्याचा आताही विकास होईल असा आम्हाला विश्वास आहे. पर्यटनदृष्ट्या आम्हाला मालवणचा विकास व्हावा यासाठीच आम्ही भाजपामध्ये पक्षप्रवेश करत आहोत, असे मनोगत ठाकरेंच्या माजी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील कोकणातील अनेक महत्त्वाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून रवींद्र चव्हाण हे कोकणातील राजकारणावर जास्त लक्ष देत असल्याचे म्हटले जात आहे. मालवणमधील या पक्षबदलांमुळे आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

 

Web Title: thackeray group another major setback in malvan konkan 10 office bearers and former corporators join bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.