“काहीही होऊ शकते, भुजबळ अजितदादांसोबत राहतील असे वाटत नाही”; ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 13:37 IST2024-12-25T13:36:46+5:302024-12-25T13:37:31+5:30
Thackeray Group Ambadas Danve News: अंजली दमानिया जे बोलल्या आहेत, ते बरोबर आहे, असेही ठाकरे गटाच्या नेत्यांनी म्हटले आहे.

“काहीही होऊ शकते, भुजबळ अजितदादांसोबत राहतील असे वाटत नाही”; ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा
Thackeray Group Ambadas Danve News: मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ ओबीसी समाजातील संघटना, आघाड्या, संस्था यांच्या सभा, बैठका घेत आहेत. एकीकडे छगन भुजबळ सातत्याने अजित पवार यांच्यावर टीका करताना तीव्र नाराजी बोलून दाखवत आहेत, तर दुसरीकडे छगन भुजबळ मोर्चेबांधणी करताना पाहायला मिळत आहेत. याचाच एक भाग म्हणून छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. छगन भुजबळ यांच्या नाराजीवरून राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया येत असून, ठाकरे गटाच्या नेत्यांनी मोठा दावा केला आहे.
मंत्रिमंडळात भाजपाच्या वाट्याचे एक मंत्रीपद रिक्त आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीतील नाराज आमदार लक्ष ठेवून आहेत. भाजपामधील कोणाची यावर वर्णी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यातच नाराज असलेले छगन भुजबळ मंत्रिपदासाठी भाजपामध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात आहे. यातच ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छगन भुजबळ यांच्या नाराजीप्रकरणी मोठा दावा केला आहे.
काहीही होऊ शकते, भुजबळ अजितदादांसोबत राहतील असे वाटत नाही
काहीही होऊ शकते. ज्या पद्धतीने छगन भुजबळ व्यक्त होत आहेत, ते पाहता अजित पवार यांच्यासोबत राहतील, असे वाटत नाही. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ यांची भेट होत नाही. पण, छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट मात्र होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया जे बोलल्या आहेत, ते बरोबर आहे, असा दावा अंबादास दानवे यांनी केला.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख प्रकरणावर अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली. बीड प्रकरणात आरोपी सरकाला सापडत नाही. सरकार गंभीर पावले उचलत नाही. आरोपी आणि पोलीस यांचे व्हिडिओ समोर आले होते. बीड जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर आहे, असे दानवे म्हणाले.