“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 10:02 IST2025-11-07T09:59:29+5:302025-11-07T10:02:12+5:30
Parth Pawar Land Deal: खडसेंचा राजीनामा घेतला गेला होता. चौकशी होईपर्यंत नैतिकता राखून अजित पवारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
Ambadas Danve News: पुण्यातील कथित जमीन व्यवहार प्रकरणाशी आपला दुरान्वयानेही संबंध नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. परंतु, त्याचवेळी मागे तीन-चार महिन्यांपूर्वी अशा प्रकारच्या गोष्टींची चर्चा ऐकली होती आणि त्यावेळीच मी स्पष्ट सूचना दिल्या होत्या की, कोणतेही चुकीचे व्यवहार मला मान्य नाहीत. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत, त्यानुसार ती चौकशी जरूर व्हावी आणि सत्य काय आहे ते समोर यावे, असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. यावरून आता महाविकास आघाडीतील विरोधी पक्ष बोचरी टीका करत असून, नैतिकता म्हणून अजित पवारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीकडून १,८०० कोटींचे बाजारमूल्य असणारी जमीन केवळ ३०० कोटींमध्ये खरेदी करण्यात आली. या खरेदी व्यवहारात शासनाची १५२ कोटींची फसवणूक फसवणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे खरेदी व्यवहारात केवळ ५०० रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे. यात सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांना निलंबित करण्यात आले आहे. पार्थ पवार जमीन प्रकरणात ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का?
मुलगा पुण्यात ३०० कोटींचा व्यवहार करतो, हे पित्याला ज्ञात नाही... आणि जेव्हा या मुलाचे वडील पुण्याचे पालकमंत्री आहेत.. तुमचे तुम्हाला तरी पटतेय का हे बोलताना? बाजार भावापेक्षा कमी दरात जमीन घेतली गेली आहे, खडसेंचा राजीनामा घेतला गेला होता. चौकशी होईपर्यंत नैतिकता राखून तुम्हीही राजीनामा द्या. न्या. झोटिंग समितीच्या धर्तीवर कोरेगाव पार्क प्रकरणातही समिती मुख्यमंत्री महोदयांनी नेमावी. अशी आमची स्पष्ट मागणी आहे, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणासंदर्भात सर्व माहिती मागविली असून योग्य चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीच्या आधारावर यासंदर्भात पावले उचलू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. प्राथमिकदृष्ट्या जे मुद्दे समोर आले आहेत ते गंभीर आहेत. त्याबाबत पूर्ण माहिती घेऊनच बोलेन. उपमुख्यमंत्री अजित पवार कुठल्याही प्रकाराला पाठीशी घालणार नाहीत. कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे ही आमची भूमिका आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुलगा पुण्यात ३०० कोटींचा व्यवहार करतो, हे पित्याला ज्ञात नाही... आणि जेव्हा या मुलाचे वडील पुण्याचे पालकमंत्री आहेत..
— Ambadas Danve (@iambadasdanve) November 7, 2025
तुमचं तुम्हाला तरी पटतंय का हे बोलताना?
बाजार भावापेक्षा कमी दरात जमीन घेतली गेली आहे, खडसेंचा राजीनामा घेतला गेला होता. चौकशी होईपर्यंत नैतिकता राखून…