"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 19:00 IST2025-10-12T18:59:12+5:302025-10-12T19:00:28+5:30
Ramdas Athawale On Prakash Ambedkar: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील भेटीगाठी वाढल्यानंतर रामदास आठवलेंनी प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या मातोश्रीला भेट दिली. गेल्या तीन महिन्यांमध्ये ठाकरे बंधूंची ही सातवी भेट आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वाढत्या जवळीकतेला राज्याच्या राजकारणात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या भेटीगाठी सुरू असतानाच, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावर प्रतिक्रिया देत दलित ऐक्याबद्दल मोठे विधान केले.
रामदास आठवले म्हणाले की, "ऐक्य हा सर्वांच्याच आवडीचा विषय आहे. माझ्या आवडीचा विषय आहे, पत्रकारांच्याही आवडीचा विषय आहे. परंतु, आता शिवसेनेमध्ये ऐक्य होत का ते पाहूयात. राष्ट्रवादीमध्ये ऐक्य होत का ते पाहूयात, पण जर असं ऐक्य होत असेल तर त्या ऐक्याला माझा पाठिंबा आहे. रिपब्लिकन ऐक्यासाठी आम्ही पॉझिटिव्ह आहोत. प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आल्याशिवाय ऐक्य होणार नाही."जशा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी होत आहेत, तशा माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्याही भेटीगाठी व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे."
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ते यापूर्वी 'मातोश्री'वर गेले होते. तसेच, सरकारने त्रीभाषा सूत्रीचा अध्यादेश रद्द केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पहिल्यांदा एका व्यासपीठावर एकत्र आले. त्यानंतर ठाकरे बंधूंमधील भेटीगाठी वाढल्या आहेत, ज्याला राजकीय वर्तुळात मोठे संकेत मानले जात आहेत.