ठाकरे बंधू एकत्र, उत्साह वाढला; पण अचानक ‘राज’ आज्ञा अन् मनसे इच्छुकांचा पुन्हा भ्रमनिरास
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 15:42 IST2025-11-23T15:42:28+5:302025-11-23T15:42:28+5:30
Maharashtra Local Body Election 2025: पराभव नको म्हणून काय निवडणूक लढवायची नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठाकरे बंधू एकत्र, उत्साह वाढला; पण अचानक ‘राज’ आज्ञा अन् मनसे इच्छुकांचा पुन्हा भ्रमनिरास
Maharashtra Local Body Election 2025: महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणुका होत आहेत. बिनविरोध होणाऱ्या निवडणुकांवरून विरोधक महाविकास आघाडी सत्ताधारी महायुतीवर टीका करत आहेत. यातच मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढत असल्याने मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढल्याचे चित्र आहे. असे असले तरी राज ठाकरे यांच्या एका निर्णयामुळे मनसे पक्षातील इच्छुकांचा पुन्हा भ्रमनिरास झाल्याचे म्हटले जात आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला सोबत घेण्यावरून महाविकास आघाडीत पुन्हा एकदा मतभेदांचे वादळ उठले आहे. मविआतील काँग्रेस, उद्धवसेना व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वेगवेगळ्या भूमिका समोर आल्या आहेत. मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या मनसेविरोधी भूमिकेला छेद देत काँगेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्रित आले पाहिजे, असे म्हटले आहे. दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनीही मनसेला सोबत घेण्याची तयारी दर्शविली आहे. यातच नगरपरिषदांची निवडणूक न लढवण्याचा मानस राज ठाकरे यांनी बोलून दाखवल्याने मनसे कार्यकर्त्यांच्या पदरी पुन्हा निराशा पडल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मनसे इच्छुकांचा पुन्हा भ्रमनिरास
मनसेच्या माध्यमातून राज ठाकरे यांना पहिली सत्ता नाशिक महापालिकेत मिळाली होती. या शहरासह ग्रामीण भागात उत्साही कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत. प्रत्येक नगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद निवडणुकीत ते उमेदवार म्हणून सज्ज असतात. यंदाही राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या. स्थानिक पातळीवर इच्छुकांच्या मुलाखतीही झाल्या. पण अचानक राजाज्ञा आली. नगरपरिषदांची निवडणूक लढवायची नाही. पुन्हा इच्छुकांचा भ्रमनिरास झाला. आता निवडणूक न लढविण्यामागे वेगवेगळी कारणे चर्चेत आहेत. पराभव नकोही असेल, पण म्हणून काय निवडणूक लढवायची नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, महापालिकेच्या निवडणुका जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता असून, त्या दृष्टीने राजकीय पक्षांची तयारी वेगाने पुढे सरकत आहे. मध्यंतरी राष्ट्रवादी शरद पवार गट, उद्धवसेना, काँग्रेस आणि मनसेची एकत्रित बैठक झाली. यात काँग्रेसने मनसेसोबत जाण्यास नकार दिला असला तरी इंडिया आघाडीबरोबर स्थानिक पातळीवर आघाडी होऊ शकते, असे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केले. त्यानुसार स्थानिक पातळीवर आघाडी करणार असल्याचे मात्र, मनसेसमवेत जाणार नसल्याचे स्थानिक शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी सांगितले.