10th, 12th Exam: दहावी परीक्षा रद्द, बारावीची होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 05:58 IST2021-04-21T05:58:17+5:302021-04-21T05:58:51+5:30
HSC, SCC Exam Descision: बारावीची परीक्षा होणार हे निश्चित आहे. मे महिन्याच्या अखेरीस बारावीची परीक्षा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.

10th, 12th Exam: दहावी परीक्षा रद्द, बारावीची होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविड १९ ची परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत तसेच इतर केंद्रीय, आंतरराष्ट्रीय मंडळांनी त्यांच्या दहावीच्यापरीक्षा रद्द केल्यामुळे गुणांच्या समानीकरणासाठी अखेर राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्यापरीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, बारावीच्या परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यामुळे राज्यातील दहावीचे सात विभागीय मंडळांतील तब्बल १६ लाख विद्यार्थी अंतर्गत मूल्यमापनाद्वारे उत्तीर्ण होतील.
देशातील इतर सर्व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बोर्डांनी त्यांच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहे. सर्व बोर्डांच्या निर्णयांमध्ये समानता राहावी म्हणून राज्य मंडळाचीही दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. अंतर्गत मूल्यमापन कसे आणि कोणत्या पद्धतीने करायचे यासाठी मार्गदर्शक सूचना लवकरच दिल्या जातील. तसेच दहावीचे जे विद्यार्थी त्यांच्या गुणांबाबत समाधानी नसतील, त्यांना गुण सुधारण्याची संधी दिली जाईल. यासंबंधी कशा पद्धतीने कार्यवाही होईल, त्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय जाहीर केला जाईल, असे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, बारावीची परीक्षा होणार हे निश्चित आहे. मे महिन्याच्या अखेरीस बारावीची परीक्षा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.
राज्यातील १६ लाख विद्यार्थ्यांना दिलासा
विभागीय मंडळ - विद्यार्थीसंख्या
पुणे - २७१५०३
नागपूर - १५६२७१
औरंगाबाद - १७७३११
मुंबई - ३५९९३५
कोल्हापूर - १३६२४२
अमरावती - १५९७७१
नाशिक - २०१६७५
लातूर - १०५९१७
कोकण - ३१५८१
एकूण - १६००२०६