गोंदियातील गुरुजींना टीईटीसाठी ऑफरचे फोन, पेपरसाठी तीन ते दीड लाख रुपयांपर्यंत केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 06:59 IST2025-11-25T06:58:57+5:302025-11-25T06:59:21+5:30
Gondia News: महाराष्ट्र शासनातर्फे होणाऱ्या टीईटी (शिक्षक पात्रता) परीक्षेपूर्वी पेपर फोडण्याच्या तयारीत असलेल्या रॅकेटचा कोल्हापूर जिल्ह्यात पर्दाफाश करण्यात आला. यानंतर राज्यभरात या घटेनेने खळबळ उडाली असून, शिक्षणक्षेत्र पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

गोंदियातील गुरुजींना टीईटीसाठी ऑफरचे फोन, पेपरसाठी तीन ते दीड लाख रुपयांपर्यंत केली मागणी
गोंदिया - महाराष्ट्र शासनातर्फे होणाऱ्या टीईटी (शिक्षक पात्रता) परीक्षेपूर्वी पेपर फोडण्याच्या तयारीत असलेल्या रॅकेटचा कोल्हापूर जिल्ह्यात पर्दाफाश करण्यात आला. यानंतर राज्यभरात या घटेनेने खळबळ उडाली असून, शिक्षणक्षेत्र पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. टीईटी पेपरच्या आदल्या दिवशी जिल्ह्यात शंभरावर परीक्षार्थीशिक्षकांना पेपरसाठी मराठवाड्यातून कॉल आले. पेपरकरिता दीड लाख रुपयांपासून तीन लाखांपर्यंत मागणी करण्यात आल्याची माहिती आहे. शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) करिता रविवारी राज्यात परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातील शंभरावर शिक्षकांना परीक्षेच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी मराठवाड्यातून कॉल आले.
चाैकशी समिती स्थापन
नाशिक जिल्ह्यात इंग्रजी माध्यमांसाठी मराठी पेपर दिल्याच्या प्रकरणाची राज्य परीक्षा परिषदेने गंभीर दखल घेतली आहे. सीडीओ मेरी शाळेतील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडल्याचे माध्यमातून समाेर आले. सुमारे ४५० विद्यार्थ्यांना इंग्रजीऐवजी मराठीची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याची नाेंद आहे. या प्रकाराबाबत तत्काळ संपर्क साधून तेथील शिक्षण अधिकाऱ्यांना या प्रकाराबाबत सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
आणखी १० जणांवर गुन्हा
पेपर फोडण्यापूर्वीच कोल्हापूर पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्या असून रविवारी ९ जणांवर तर सोमवारी आणखी दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.. त्यामध्ये रोहित पांडुरंग सावंत (वय ३५, रा. कासारपुतळे, जि. कोल्हापूर), अभिजीत विष्णू पाटील (४०, रा. बोरवडे, , जि. कोल्हापूर), संदीप भगवान गायकवाड (४६, रा. बेलवाडी, जि. सातारा), अमोल पांडुरंग जरग (३८, रा. सरवडे, , जि. कोल्हापूर), स्वप्निल शंकर पोवार (३५, रा. कासारपुतळे, जि. कोल्हापूर), रणधीर तुकाराम शेवाळे (४६, रा. सैदापूर, जि. सातारा), तेजस दीपक मुळीक (२२, रा. निमसोड, जि. सांगली), प्रणय नवनाथ सुतार (३२, रा. खोजेवाडी, जि. सातारा), संदीप शिवाजी चव्हाण (४०, रा. कोपार्डे हवेली, जि. सातारा) आणि श्रीकांत नथुराम चव्हाण (४३, रा. उंब्रज जि. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. न्यायालयाने त्यांना मंगळवारपर्यंत (दि. २५) पोलिस कोठडी दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली.
कोणताही गैरप्रकार नाही
पुणे : रविवारी ४ लाख ४६ हजार ७३० विद्यार्थ्यांनी ही टीइटी परीक्षा दिली असून, काही ठिकाणी परीक्षेत अनुचित प्रकार घडल्याचे समाेर आल्याने परीक्षा रद्द तर हाेणार नाही ना, अशी चिंता परीक्षार्थींना वाटत हाेती. याबाबत राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी काेणताही गैरप्रकार घडला नसल्याचा दावा करून परीक्षार्थींनी चिंता करू नये, असेही आश्वासित केले.