सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 21:04 IST2025-12-25T20:56:10+5:302025-12-25T21:04:37+5:30
Tara Tiger: मोठ्या मगरींचा वावर असलेल्या वारणा धरणाच्या अथांग बॅकवॉटरमध्ये तब्बल दीड किलोमीटरचे अंतर अवघ्या ४५ मिनिटांत न थांबता पोहून पार करत ताराने राज्यातील व्याघ्र संवर्धनाच्या इतिहासात एका ऐतिहासिक नोंदीची भर घातली आहे.

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
- विकास शहा
शिराळा - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सह्याद्रीच्या जंगलात नुकतेच आगमन झालेल्या 'तारा' वाघिणीने आपल्या अचाट साहसाने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनाही थक्क केले आहे. मोठ्या मगरींचा वावर असलेल्या वारणा धरणाच्या अथांग बॅकवॉटरमध्ये तब्बल दीड किलोमीटरचे अंतर अवघ्या ४५ मिनिटांत न थांबता पोहून पार करत ताराने राज्यातील व्याघ्र संवर्धनाच्या इतिहासात एका ऐतिहासिक नोंदीची भर घातली आहे.
ताडोबा येथून आणलेल्या 'तारा'ला ९ डिसेंबर रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आले होते. १८ डिसेंबरला ती विलग्न वासाच्या पिंजऱ्यातून बाहेर पडून अधिवासाच्या शोधात बाहेर पडली. १९ डिसेंबर रोजी चांदोली वनक्षेत्रातील वारणा धरणाच्या बॅकवॉटरपाशी ती आली. त्याठिकाणी ती बराच वेळ बसली.
सायंकाळी सहा वाजता तिने धरणाच्या पाण्यात उडी मारली.यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना वाटले काहीवेळ पाण्यात राहून निवळे आदी जवळपास जाईल.मात्र तारा थांबलीच नाही.दोनशे मीटर गेल्यावर तिने डाव्या बाजूला वळून झोळंबी परिक्षेत्रात प्रवेश केला. या पाण्यात मोठ मोठ्या मगरी आहेत त्यामुळे तारा ला धोका तर होणार नाहीना याची चिंता वनविभागाच्या अधिकाऱ्यांना भीती होती.मात्र ताराने दुसऱ्या तीरावर म्हणजे झोळंबी परिक्षेत्रात प्रवेश करून रात्री शिकार ही केली.तीने झोळंबी कोअर झोन मधून बफर झोन मध्ये प्रवेश प्रवेश करून त्याठिकाणी तिचे वास्तव्य आहे.
वारणा धरणाच्या या क्षेत्रात मोठ्या मगरींची संख्या जास्त असल्याने वनविभागाच्या मनात तिच्या सुरक्षिततेबाबत धाकधूक होती. मात्र, ताकदवान ताराने सर्व संकटांवर मात करत झोळंबी परिक्षेत्रात यशस्वी प्रवेश केला. विशेष म्हणजे, तिच्या गळ्यातील रेडिओ कॉलर पाण्याखाली असतानाही उत्तमरीत्या काम करत होती, ज्यामुळे वनविभागाला तिच्या प्रत्येक हालचालीची अचूक नोंद घेता आली. ताराने पाणी पार केल्यानंतर केवळ विश्रांती घेतली नाही, तर त्याच रात्री झोळंबी कोअर झोनमध्ये शिकारही केली. सध्या तिचे वास्तव्य ढेबेवाडी बफर झोनमध्ये आहे.
या भागात वनविभागाने नुकतेच १०० चितळ सोडले आहेत. त्यांच्या आवाजामुळे तारा या शिकारीच्या क्षेत्राकडे आकर्षित झाली असावी. तसेच यापूर्वी 'चंदा' वाघीणही याच परिसरातून गेल्याच्या खुणा आहेत, त्यामुळे आपल्या हद्दीचा अंदाज घेण्यासाठी ताराने हा धाडसी प्रवास केला असावा, असे सांगण्यात येत आहे.
"तारा वाघिणीने दीड किलोमीटर पाण्यातून प्रवास करून ढेबेवाडी बफर झोनमध्ये प्रवेश केला आहे. या भागात सोडलेल्या चितळांचा वावर आणि चंदा वाघिणीच्या खुणा यामुळे ती भक्ष शोधण्यासाठी या परिसरात आली असावी. तिच्या हालचालींवर आमचे बारीक लक्ष आहे."
- तुषार चव्हाण
क्षेत्रसंचालक, सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्प.