"एकदाच काय ते व्हिडीओ, पेन ड्राईव्ह बाहेर काढा, पण धमक्या द्यायचं बंद करा’’, अजित पवारांनी विरोधकांना सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 18:20 IST2025-07-24T18:19:45+5:302025-07-24T18:20:25+5:30
Ajit Pawar News: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात हनिट्रॅप प्रकरण चांगलंच गाजत आहे. तसेच त्यावरून विरोधी पक्षांमधील नेत्यांकडून वेगळे दावे केले जात आहेत. आपल्याकडे या प्रकरणाचे व्हिडीओ आहेत, पेन ड्राईव्ह आहेत, असे इशारे अनेक नेत्यांकडून दिले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांनी विरोधकांनी इशारा दिला आहे.

"एकदाच काय ते व्हिडीओ, पेन ड्राईव्ह बाहेर काढा, पण धमक्या द्यायचं बंद करा’’, अजित पवारांनी विरोधकांना सुनावले
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात हनिट्रॅप प्रकरण चांगलंच गाजत आहे. तसेच त्यावरून विरोधी पक्षांमधील नेत्यांकडून वेगळे दावे केले जात आहेत. आपल्याकडे या प्रकरणाचे व्हिडीओ आहेत, पेन ड्राईव्ह आहेत, असे इशारे अनेक नेत्यांकडून दिले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांनी विरोधकांनी इशारा दिला आहे. ’एकदाच काय ते व्हिडीओ, पेन ड्राईव्ह बाहेर काढा, कुणाला हनिट्रॅपची काय माहिती आहे ते बाहेर येऊ द्या, पण धमक्या द्यायचं बंद करा’ असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
प्रसारमाध्यमांशी संवादा साधत असताना याबाबत प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले की, असे दावे करणं हे विरोधकांचं कामच आहे. ज्यांच्याकडे असे व्हिडीओ आहेत, पेन ड्राईव्ह आहेत, ते बाहेरच येऊद्या, मात्र दम द्यायचं बंद करा. कुणाकडे काय पेन ड्राईव्ह आहेत. कुणाकडे काय व्हिडीओ आहेत, कुणाकडे आणखी काय माहिती आहे, कुणाकडे हनिट्रॅपच्या संदर्भात काय माहिती आहे, ती सगळी एकदा बाहेर येऊ द्या. त्यावरून कोण कसं वागतंय हे आपल्यालाही समजून जाईल, असं विधान अजित पवार यांनी केलं.
ते पुढे म्हणाले की, वेगवेगळे मान्यवर गेली अनेक वर्षे असे दावे करत आहेत. याबाबत अगदी मागच्या आणि त्याचा आधीच्या सरकारच्या काळातही बोललं जात होतं. आता ह्याही सरकारच्या काळात बोललं जात आहे. तसेच प्रत्येक जण काही तरी पेन ड्राईव्ह दाखवतो आणि म्हणतो हा पाहा पेन ड्राईव्ह. अरे तो पेन ड्राईव्ह दाखवा तरी, लोकांनाही कळू द्या आणि सत्य लोकांसमोर येऊ द्या, असा टोला अजित पवार यांनी लगावला.