अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 14:43 IST2025-09-28T14:39:28+5:302025-09-28T14:43:35+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी विशेष अधिवेशनाची मागणी केली आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
मागील काही दिवसापासून मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू आहे. या पावसामुळे नद्यांना महापूर आला असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बीड, धाराशिव जिल्ह्यात अनेक गोठ्यात असलेल्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. तसेच शेतातील पिकांसह मातीही वाहून गेली आहे, या पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या अतोनात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वबणूवर महाराष्ट्र विधानमंडळाचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.
आमदार जयंत पाटील यांनी याबाबत राज्यपाल यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा उल्लेख केला असून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्याने तहसील कार्यालयातच घेतले विष ! न्यायालयाच्या आदेशानंतरही प्रशासनाची टाळाटाळ
पत्रात नेमके काय?
"यावर्षी राज्यभरात पावसाने थैमान घातले आहे. मागील आठवड्याभरापासून तर पावसाचा जोर अधिकच वाढला आहे. ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत. शेतीचा चिखल झाला आहे, शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत, पूरग्रस्त भागात अनेक लोक अडकले आहेत, तर काही लोकांनी जीव गमावला आहे. संपूर्ण राज्यात हाहाकार माजला आहे.
मी मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या गावांना प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी करत आहे. शेतकऱ्यांवर मोठा बिकट काळ ओढावला आहे. पूराच्या पाण्यामुळे फक्त पिकं नष्ट झाली असे नाही तर शेतकऱ्यांची जमीनही खरडून वाहून गेली आहे. नुकसान इतके झाले आहे की शेतकरी वर्षभर रावला तरी परिस्थिती स्थिरस्थावर होणार नाही असे दिसते.
अशा संकटाच्या काळात सरकारने भरीव मदत करणे गरजेचे आहे. पण सरकार असे करताना दिसत नाही. महोदय, हे काही योग्य नाही. त्यामुळे या विषयावर सविस्तर चर्चा व्हावी व तात्काळ निर्णय व्हावा यासाठी महाराष्ट्र विधानमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने विनंती करीत असल्याचे या पत्रात जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सरकारने ठोस निर्णय घ्यावा यासाठी विशेष अधिवेशनाची घोषणा करावी!
राज्यभरात पावसाने कहर केला आहे. शेतकरी, जनावरे, घरे, जनजीवन सर्व उद्ध्वस्त झाले आहे. परंतु, सरकारकडून आवश्यक मदत होताना दिसत नाही.
शेतकरी व नागरिकांचे प्रश्न ऐकले जावेत, नुकसान भरपाई व… pic.twitter.com/0PAA8nUHK8— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) September 28, 2025