ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 16:46 IST2025-06-28T16:45:35+5:302025-06-28T16:46:24+5:30

Sunil Tatkare News: ठाकरे बंधूंच्या मोर्चामुळे महायुतीला फटका बसेल का, महाविकास आघाडीत राज ठाकरे हे चौथे भिडू असतील का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे म्हटले जात आहे.

sunil tatkare reaction over will the ncp ajit pawar group participate in raj thackeray and uddhav thackeray morcha about marathi and hindi issue | ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान

ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान

Sunil Tatkare News: मराठी शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीविरोधात आता मनसे आणि उद्धवसेनेचा एकत्र मोर्चा निघणार आहे. या दोन्ही पक्षांनी यापूर्वी जाहीर केलेल्या तारखा बदलण्यात आल्या असून, आता हा मोर्चा ५ जुलै रोजी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा काढण्यात येणार आहे. काँग्रेस आणि शरद पवार गट हेही मोर्चात सहभागी होणार आहेत. हिंदीच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीत मतैक्य दिसत आहे. त्याचवेळी सत्तारुढ महायुतीत मतैक्याचा अभाव असल्याचे चित्र आहे. मोर्चाच्या निमित्ताने ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्र येत असल्याने महाविकास आघाडीत राज ठाकरे हे चौथे भिडू असतील का अशी चर्चादेखील सुरू झाली आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या मोर्चात सहभागी होणार का, याबाबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना सुनील तटकरे यांनी सांगितले की, ५ जुलै रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणताच नेता सहभागी होणार नाही. हा विरोधी पक्षाने काढलेला मोर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या संदर्भात काही भावना व्यक्त करायच्या असतील तर आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. 

निवडणुका महायुती म्हणूनच लढण्याचे ठरले आहे

ठाकरे बंधूंच्या मोर्चाला शरद पवार गटाने पाठिंबा दिला आहे. यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, शरद पवार यांनी मोर्चाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्ह नाहीत. मला याबाबत काहीच बोलण्याचे कारण नाही. राज्यातील निवडणुका महायुती म्हणूनच लढण्याचे ठरले आहे. असे असताना कोणाला काही वेगळा निर्णय घ्यायचा असेल तर ते स्वतंत्र आहेत, त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. आम्हाला ज्या पद्धतीने निवडणुकीला सामोरे जायचं आहे, त्या पद्धतीने आम्ही सामोरे जाऊ, असे तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, ठाकरे बंधूंच्या मोर्चामुळे महायुतीला फटका बसेल का, यावर बोलताना, ठाकरे बंधूंच्या मोर्चाकडे राजकीयदृष्ट्या बघत नाही. लोकशाहीत मोर्चा काढण्याचा सर्वांना अधिकार आहे. ठाकरे बंधुच्या मोर्चाने राज्यात फार मोठा बदल किंवा मराठी मतांचे ध्रुवीकरण होणार नाही, असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.

 

Web Title: sunil tatkare reaction over will the ncp ajit pawar group participate in raj thackeray and uddhav thackeray morcha about marathi and hindi issue