मद्यपानाविरोधात एसटीची सक्त भूमिका, चालक-वाहकांसाठी अल्कोटेस्ट तपासणी सक्तीची, प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 14:53 IST2026-03-05T14:53:26+5:302026-03-05T14:53:58+5:30

State Transport Maharashtra: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) सेवेत असताना मद्यपानास आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी कठोर उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ST's strong stance against drunkenness, breathalyzer test mandatory for drivers and conductors, Pratap Sarnaik gave information | मद्यपानाविरोधात एसटीची सक्त भूमिका, चालक-वाहकांसाठी अल्कोटेस्ट तपासणी सक्तीची, प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती  

मद्यपानाविरोधात एसटीची सक्त भूमिका, चालक-वाहकांसाठी अल्कोटेस्ट तपासणी सक्तीची, प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती  

मुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) सेवेत असताना मद्यपानास आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी कठोर उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार आगारात कामावर हजर होणाऱ्या सर्व चालकांची अल्कोटेस्ट मशीनद्वारे दररोज मद्यपान तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले असून, योग्य नोंदी घेऊनच चालकांना कर्तव्यावर पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

२५ जानेवारी रोजी मंत्री सरनाईक यांनी मुंबईतील परळ बसस्थानकाला अचानक भेट दिली. यावेळी चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांमध्ये अनेक मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. तसेच काही कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत असल्याचेही निदर्शनास आले. या धक्कादायक प्रकाराची गंभीर दखल घेत मंत्री सरनाईक यांनी तातडीने चौकशी समिती नेमून या प्रकरणास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. तसेच असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी कडक उपाययोजना करण्यासही सांगितले होते.

त्याअनुषंगाने एसटी प्रशासनाने तीन अधिकाऱ्यांची समिती नेमून या प्रकरणाची सखोल चौकशी केली. चौकशीमध्ये दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजनाही सुचविण्यात आल्या आहेत. सदर चौकशी अहवाल एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांना सादर करण्यात आला असून त्यांच्या निर्देशानुसार दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच समितीने सुचविलेल्या उपाययोजना तातडीने सर्व आगारांमध्ये लागू करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

नव्या उपाययोजनांनुसार आगारात कामावर हजर होणाऱ्या चालकांची वाहन परीक्षकांच्या माध्यमातून नियमित तपासणी केली जाणार आहे. तसेच वाहकांचीही ड्युटी देण्यापूर्वी अल्कोटेस्ट मशीनद्वारे तपासणी करून त्याची नोंद ठेवणे आवश्यक राहणार आहे. चालक व वाहकांची मद्यपान तपासणी झाली आहे की नाही, यावर सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, सहाय्यक वाहतूक अधीक्षक, वाहतूक निरीक्षक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक आणि वाहतूक नियंत्रक यांनी देखरेख ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच आगार व्यवस्थापकांनीही नियमित नियंत्रण ठेवून या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

बस मार्गावर असताना चालकाने नियंत्रण कक्षात लॉगबुकची नोंद करणे बंधनकारक राहणार आहे. चालकाने नोंद केल्यानंतर त्याची पुन्हा एकदा अल्कोटेस्ट तपासणी करून योग्य नोंद घेतल्यानंतरच पुढील मार्गावर पाठविण्याची सक्ती करण्यात आली आहे. ही तपासणी नियमितपणे होत आहे की नाही, याची खात्री स्थानक प्रमुखांनी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

याशिवाय बसस्थानक व आगार परिसरातील चालक, वाहक आणि विश्रांतीगृहांमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांचीही वेळोवेळी अल्कोटेस्ट मशीनद्वारे तपासणी करून त्याची नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. संबंधित विभागातील पालक अधिकाऱ्यांनी आगार व बसस्थानक भेटीदरम्यान या उपाययोजनांची अंमलबजावणी तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, या बाबतीत दक्षता विभागाकडून वेळोवेळी गोपनीय तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. मार्गतपासणी पथक, वाहतूक निरीक्षक, प्रशिक्षण विभाग आणि सुरक्षा विभाग यांच्या माध्यमातून तपासणी कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात येणार असून सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मद्यपानाचे दुष्परिणाम याबाबत प्रबोधन केले जाणार आहे. तसेच आगारांमध्ये विशेष ‘मद्यपान जनजागृती सप्ताह’ आयोजित करून चालक-वाहक व इतर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

यासोबतच जिल्ह्यातील मुख्य बसस्थानक, चालक-वाहक विश्रांतीगृहे तसेच ज्या आगारांमध्ये चालक-वाहक जास्त प्रमाणात थांबतात अशा ठिकाणी मद्यपानास प्रतिबंध करण्यासाठी विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अतिथ्यगृह परिसरातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, लाईट-पंखे आदी सुविधांची देखभाल करण्याची जबाबदारीही संबंधित अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत एसटी प्रशासनाने मद्यपानासंदर्भात कठोर भूमिका घेतली असून या उपाययोजनांमुळे बससेवा अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध होईल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

Web Title : एसटी ने चालकों, कंडक्टरों के लिए सख्त अल्कोहल परीक्षण लागू किया: सरनाईक

Web Summary : महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) ने बस स्टेशन पर शराब के उपयोग के कारण चालकों के लिए दैनिक अल्कोहल परीक्षण अनिवार्य कर दिया है। मंत्री सरनाईक ने जांच के आदेश दिए, जिसके परिणामस्वरूप अनुशासनात्मक कार्रवाई और यात्री सुरक्षा के लिए नए उपाय किए गए, जिसमें नियमित जांच और जागरूकता कार्यक्रम शामिल हैं।

Web Title : ST implements strict alcohol testing for drivers, conductors: Sarnaik

Web Summary : Maharashtra State Transport (ST) mandates daily alcohol tests for drivers, prompted by alcohol use found at a bus station. Minister Sarnaik ordered investigations, resulting in disciplinary actions and new measures for enhanced passenger safety, including regular checks and awareness programs.