"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 21:14 IST2025-04-29T21:14:01+5:302025-04-29T21:14:54+5:30
काँग्रेसचा १ मे रोजी परळीत 'संविधान संकल्प सत्याग्रह'

"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
Harshvardhan Sapkal: छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या राज्यात काही शक्ती जाणीवपूर्वक द्वेष, मत्सर पसरवत आहेत. नागपूर व नाशिकमध्ये या शक्तींनी सामाजिक शांतता बिघडवण्याचे काम केले आहे. नाशिकमधील हिंसक घटनेत सहभागी असलेल्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहरात हुतात्मा स्मारक ते गाडगे महाराज पुलापर्यंत संविधान सद्भावना यात्रा काढण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
संविधानाने बदलली हुकुमशाही मानसिकता
"छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा विचार सर्वांसाठी प्रमाण आहे. गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यासारख्या थोर संतांच्या विचाराचा वारसा आपल्याला लाभला आहे. माणुसकीचा धर्म त्यांनी शिकवला आहे. संविधानाने शोषित, पीडित, दलित व वंचित समाजाला अधिकार दिले. महिलांना मतदानाचा अधिकार दिला, स्त्री-पुरुष समानतेचे सूत्र आपण स्विकारले. मुठभर हातात राज्यसत्ता व धर्मसत्ता होती आणि 'हम करे सो कायदा' होता पण संविधानाने ही परिस्थिती बदलली," असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
जातीधर्मात भांडणे लावणे महाराष्ट्रासाठी अशोभनीय
"आज काही लोक जातीजातीत व धर्माधर्मात भांडणे लावत आहेत. हे महाराष्ट्राला शोभणारे नाही. म्हणूनच काँग्रेस सर्वांच्या मनात सद्भावना वाढीस लागावी यासाठी राज्यात सद्भावना यात्रा काढत आहे. मस्साजोग ते बीड व नागपूर येथील सद्भावना यात्रेनंतर आज नाशिक शहरात सद्भावना यात्रा काढण्यात आली. १ मे रोजी महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी परळीमध्ये संविधान संकल्प सत्याग्रह केला जाणार आहे तर ४ व ५ मे रोजी परभणीत संविधान बचाव यात्रा आयोजित केली आहे," असे सपकाळ यांनी सांगितले.
सद्भावनेची मशाल तेवत ठेवा!
"नाशिकमध्ये काही अप्रिय घटना घटल्या, त्याचा काँग्रेस पक्ष निषेध करतो. ज्यांनी कायदा हातात घेतला, त्यांना शिक्षा द्या पण चोर सोडून संन्यासाला फाशी असे होता कामा नये. बंधुत्व, सद्भाव, संस्कृती व परंपरेचे भान असल्याशिवाय आपण गुण्यागोविंदाने राहू शकत नाही. आज महाराष्ट्रात सामाजिक सौहार्द टिकवण्याची वेळ आली असून त्यासाठीच सद्भावना यात्रा काढली जात आहे. नाशिकमध्येही सद्भावनेची मशाल तेवत ठेवा", असे आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.