मुंबई : नगर परिषदा, नगर पंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी रंगात आली असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केलेल्या सूचक विधानांमुळे राज्यात २ डिसेंबरनंतर राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
एकीकडे महायुतीतील भाजप आणि शिंदेसेनेच्या नेत्यांमध्ये पेटलेला संघर्ष, तर दुसरीकडे महाविकास आघाडीत मनसेला सोबत घेण्यावरून काँग्रेस आणि उद्धवसेनेत झालेले मतभेद. या पार्श्वभूमीवर २ डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकांनंतर काय होणार आहे याची उत्सुकता ताणली गेली आहे. मालवणमध्ये शिंदेसेनेचे आ. नीलेश राणे यांनी भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी पैसे सापडल्याचा दावा केला. त्यावर जळगावातील भडगाव येथे पत्रकारांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी, ‘येत्या दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे’, असे विधान केले. तर सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडीत शरद पवार गट आणि शिंदेसेना यांच्या युतीबद्दल शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले, शिंदे-शिंदे एकत्र आले. ही भविष्यातील नांदी ठरू शकते.
रवींद्र चव्हाण : २ तारखेपर्यंत युती टिकवायची आहे!
येत्या दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे. त्यानंतर काय ते उत्तर देईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी भडगाव (जि. जळगाव) येथे म्हटले. आ. नीलेश राणे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष मालवणमध्ये येऊन गेल्यानंतर भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात पैसे आल्याचे म्हटले होते. यावर पत्रकारांनी विचारले असता, चव्हाण म्हणाले, येत्या २ तारखेपर्यंत युती टिकवायची आहे. मी नंतर उत्तर देईन.
शशिकांत शिंदे : शिंदे-शिंदे एकत्र, ही भविष्याची नांदी
शरद पवार गट आणि शिंदेसेना यांची कुर्डुवाडी नगर परिषदेत झालेली निवडणूकपूर्व युती भविष्यातील नांदी ठरू शकते, असे वक्तव्य शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी गुरुवारी कुर्डुवाडी येथील सभेत केले. ते म्हणाले, एकनाथ शिंदेंचा केवळ वापर करून घेतला. लढणारी माणसे कधीच शरणागती पत्करत नसतात. कुर्डुवाडीमध्ये तुम्ही लोक आज एकत्र आलाय ही कदाचित भविष्याच्या राजकारणाची नांदी ठरेल.