दुबईत अडकलेल्या मराठी पर्यटकांना राज्य सरकारची ‘महा-हेल्पलाइन’; ५०० जण सुखरूप मायदेशी परतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 06:07 IST2026-03-09T06:07:12+5:302026-03-09T06:07:28+5:30
१,२०० हून अधिक प्रभावित प्रवाशांना अखेर दिलासा

दुबईत अडकलेल्या मराठी पर्यटकांना राज्य सरकारची ‘महा-हेल्पलाइन’; ५०० जण सुखरूप मायदेशी परतले
मुंबई : दुबईमध्ये वास्तव्यास असून, मराठी जणांना, तसेच पर्यटकांना व समुदायाला मदत करण्यासाठी राज्य सरकारच्या मान्यतेने आयपीएफ महा-हेल्पलाइन ही सेवा सुरू केली असून, त्या माध्यमातून आतापर्यंत ५०० जण सुखरूप मायदेशी परतले आहेत.
सध्या इराण–अमेरिका संघर्षामुळे निर्माण झालेल्या अडचणींमुळे दुबईमध्ये महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांसाठी ही विशेष हेल्पलाइन सक्रिय करण्यात आली आहे.
ही हेल्पलाइन सुरू झाल्यानंतर अवघ्या एका दिवसात १,२०० हून अधिक प्रभावित प्रवाशांकडून मदतीची विनंती प्राप्त झाली असल्याची माहिती दुबई येथून या उपक्रमाचे नेतृत्व करणारे राहुल तुळपुळे यांनी दिली.
या मदतीमुळे दुबईमध्ये अडकलेल्या अनेक प्रवाशांना दिलासा मिळाला असून त्यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.
एक स्वतंत्र वैद्यकीय पथक तैनात
याशिवाय, स्थानिक डॉक्टरांचा सल्ला आणि आवश्यक प्रिस्क्रिप्शन मिळवून अत्यावश्यक औषधी उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र वैद्यकीय साहाय्य पथकही कार्यरत आहे.
हेल्पलाइनचे पथक दुबईतील भारतीय दूतावासाशीही सातत्याने समन्वय साधून आहे. २ ते ६ मार्च या कालावधीत दुबईतील विविध विमानतळांवरून, तसेच ओमानमधील मस्कत येथून उपलब्ध उड्डाणांद्वारे ५०० हून अधिक प्रवासी सुखरूप भारतात परतले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे दुबई येथील भारतीय काउन्सिल जनरलशी सातत्याने संपर्कात आहे.
हेल्पलाइन २४ तास सुरू
ही हेल्पलाइन सेवा ९७१५०३६५४३५७ या क्रमांकावर उपलब्ध असून, दुबईमधील पाच शहरांमध्ये कार्यरत असलेल्या २० हून अधिक स्वयंसेवकांच्या पथकाद्वारे २४ तास चालवली जात आहे. अडकलेल्या प्रवाशांना अन्न व औषधी उपलब्ध करून देणे, तात्पुरती निवासव्यवस्था, वाहतूक सुविधा, तसेच दूतावासाशी समन्वय अशा विविध प्रकारची मदत केली जात आहे.
चोख वाहतूक व्यवस्था
हेल्पलाइनचे वाहतूक समन्वयक प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली फुजैराह आणि मस्कतसारख्या पर्यायी प्रस्थान केंद्रांकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी वाहतुकीची व्यवस्था करण्यात येत आहे, तसेच नीलम नांदेडकर आणि श्वेता करंदीकर यांच्या नेतृत्वाखालील सहायक पथक लहान मुले, अर्भक आणि ज्येष्ठ नागरिक असलेल्या कुटुंबांना विशेष मदत पुरवत आहे.
दरम्यान, भूषण चौधरी आणि प्रसाद दातार हे डेटा व्यवस्थापन, हेल्पलाइनचे दैनंदिन कामकाज आणि व्हॉट्सॲप ग्रुप्सचे व्यवस्थापन पाहत असून, अडकलेले प्रवासी आणि स्वयंसेवकांच्या नेटवर्कमध्ये सुरळीत समन्वय राखण्याचे काम करत आहेत.