"State government stands firmly behind farmers" | "राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे"

"राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे"

ठळक मुद्दे'राज्य सरकारने पिकांचे नुकसान झालेल्या जिरायत, बागायत जमिनीसाठी प्रति हेक्टरी १० हजार रुपये, मदत दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्याचा निर्णय घेतला आहे. '

मुंबई : राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने आज जाहीर केलेल्या १० कोटी रुपयांच्या मदत पॅकेजचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी स्वागत करत आहे. आस्मानी संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून बळीराजाला मोठा आधार देण्याची आवश्यकता होती. अपरिमीत झालेल्या नुकसानीतून शेतकऱ्यांना उभे करणे गरजेचे होते, याच भावनेतून ही भरीव मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. त्याचे काँग्रेस पक्ष स्वागत करत आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारने पिकांचे नुकसान झालेल्या जिरायत, बागायत जमिनीसाठी प्रति हेक्टरी १० हजार रुपये, मदत दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्याचा निर्णय घेतला आहे. फळपीक नुकसानीसाठी हेक्टरी २५ हजार रुपये, रस्ते आणि पुलांसाठी २ हजार ६३५ कोटी, ग्रामीण रस्ते व पाणी पुरवठ्यासाठी १ हजार कोटी, नगर विकाससाठी ३०० कोटी, महावितरण उर्जा विभागासाठी २३९ कोटी, जलसंपदा विभागासाठी १०२ कोटी रुपये, कृषी, शेती, घरांसाठी ५ हजार ५०० कोटी रुपये असे एकूण ९ हजार ७७६ कोटी रुपयांचे हे मदत पॅकेज आहे. या मदतीमुळे शेतक-यांना पुन्हा उभे राहण्यास मोठी मदत होणार आहे, असे थोरात यांनी सांगितले. 

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक अजूनही आलेले नाही. कोरोनामुळे राज्यासमोर मोठे आर्थिक संकट आहे. केंद्र सरकारकडून हक्काचे ३८ हजार कोटी रुपये येणे प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीतही शेतकऱ्याला वाऱ्यावर न सोडता ही भरीव मदत राज्य सरकारने जाहीर केली असून दिवाळीपर्यंत ही मदत दिली जाईल. संकट काळात राज्य सरकार शेतकयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे थोरात म्हणाले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: "State government stands firmly behind farmers"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.