राज्य मंडळाबाबतही सीबीएसई बोर्डाप्रमाणे विचार सुरू, दहावी परीक्षेसाठी तज्ज्ञांशी करणार चर्चा -शिक्षणमंत्री गायकवाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 07:27 IST2021-04-15T05:17:42+5:302021-04-15T07:27:34+5:30
Varsha Gaikwad : सीबीएसईप्रमाणेच राज्यातील १०वीच्या परीक्षा घ्याव्यात, असा आग्रह विद्यार्थी आणि पालकांकडून होत आहे.

राज्य मंडळाबाबतही सीबीएसई बोर्डाप्रमाणे विचार सुरू, दहावी परीक्षेसाठी तज्ज्ञांशी करणार चर्चा -शिक्षणमंत्री गायकवाड
मुंबई : सीबीएसई बोर्डाप्रमाणे किंवा त्या पॅटर्नप्रमाणे राज्य मंडळाच्या पुढे ढकलण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षांचे तसे नियोजन करता येईल का, याची चर्चा आपण शिक्षणतज्ज्ञांशी करू आणि त्याप्रमाणे निर्णय जाहीर करू, असे शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनी बुधवारी स्पष्ट केले. सीबीएसईप्रमाणेच राज्यातील १०वीच्या परीक्षा घ्याव्यात, असा आग्रह विद्यार्थी आणि पालकांकडून होत आहे.
सीबीएसई मंडळ स्वतः तयार केलेल्या वस्तुनिष्ठ निकषांच्या आधारे विद्यार्थ्यांना निकाल देणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना या आधारावरील निकाल समाधानकारक वाटत नसेल त्यांना जूनमध्ये पुन्हा परीक्षेची संधी देण्यात येईल, त्यासाठी अनुकूल परिस्थितीत परीक्षा घेण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. याच धर्तीवर राज्यातील दहावी परीक्षेसाठी सीबीएसई पॅटर्न राबविण्याकरिता तज्ज्ञांशी चर्चा करणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.
लवकर जाहीर करा
राज्य शिक्षण मंडळाकडे अंतर्गत मूल्यमापनाची मागणी सुरुवातीपासून करत आहोत. आता सीबीएसईने निर्णय जाहीर केल्यानंतर, राज्य मंडळ यावर विचार करणार आहे. राज्य शासन व शिक्षणयंत्रणा उशिरा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताशी खेळ करीत आहे. योग्य निर्णय घेऊन ताे लवकरात लवकर जाहीर करावा.
- अनुभा सहाय, अध्यक्षा,
इंडिया वाइड पॅरेंटस् असोसिएशन