MSRTC Recruitment 2026: ST महामंडळात महाभरती होणार, १७ हजार ४८२ पदे भरणार; कोणाला प्राधान्य मिळणार? पाहा, सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 11:46 IST2026-03-12T11:44:47+5:302026-03-12T11:46:06+5:30
ST Bus Mega Bharti 2026 News: याबाबत मंत्री प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली.

MSRTC Recruitment 2026: ST महामंडळात महाभरती होणार, १७ हजार ४८२ पदे भरणार; कोणाला प्राधान्य मिळणार? पाहा, सविस्तर
MSRTC Recruitment 2026 Mega Bharti: परिवहन महामंडळात (एसटी) लवकरच मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून एकूण १७ हजार ४८२ पदांची महाभरती करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या भरती प्रक्रियेत सध्या कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्याने संधी देण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विधिमंडळात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, एसटी महामंडळात सध्या चालक व वाहकांच्या पदांवर मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहेत. त्यामुळे प्रवासी सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आणि ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी ही भरती आवश्यक आहे. त्यासाठी चालक आणि वाहकांच्या भरतीचा प्रस्ताव शासनाच्या वित्त विभागाकडे पाठविण्यात आला असून मंजुरी मिळाल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू केली जाईल, असे त्यांनी सांगितले. भविष्यात नियमित भरती प्रक्रियेत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा विचार करून त्यांना प्राधान्य देण्याचा विचार शासन करीत आहे.
दरवर्षी पाच हजार नवीन बस खरेदी करण्याचा प्रस्ताव
एसटी महामंडळाची सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सुमारे दरवर्षी पाच हजार नवीन बस खरेदी करण्याचा प्रस्तावही सरकारकडून तयार करण्यात आला आहे. त्यापैकी तीन हजार बसांच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून टाटा मोटर्सला सुमारे २१०० बस खरेदीचा आदेश देण्यात आला असल्याची माहितीही मंत्री सरनाईक यांनी दिली.
प्रवाशांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध
परिवहन मंत्री सरनाईक यांनी पुढे सांगितले की, एसटी महामंडळ सध्या आर्थिक अडचणीत असले तरी प्रवाशांना विविध सवलती देण्याचे सामाजिक दायित्व राज्य सरकार पार पाडत आहे. महिलांना ५० टक्के भाडे सवलत, तसेच ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास यांसारख्या योजना सुरू आहेत. विधानमंडळ सदस्य, पत्रकार यांनाही काही प्रमाणात प्रवास सवलती दिल्या जातात. या सुविधा देताना एसटीला आर्थिक ताण सहन करावा लागतो, तरीही प्रवाशांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, एसटी ही ग्रामीण भागातील जीवनरेखा आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी चालक-वाहकांची भरती, नवीन बस खरेदी आणि व्यवस्थापन सुधारणा या सर्व उपाययोजना राबविण्यात येत आहेत, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.