माझी एसटी कुठे आहे..?, एसटीची ॲपसेवा रखडली; १५ ऑगस्टची डेडलाइन हुकली, आता पुढे काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 12:53 IST2025-08-19T12:52:07+5:302025-08-19T12:53:48+5:30
कंत्राटदाराने वेळेत काम पूर्ण न केल्यास त्याच्यावर कारवाई या इशाऱ्याचे काय झाले? असाही सवाल उपस्थित होत आहे

माझी एसटी कुठे आहे..?, एसटीची ॲपसेवा रखडली; १५ ऑगस्टची डेडलाइन हुकली, आता पुढे काय?
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आपण जिची आतुरतेने वाट पाहत आहोत, ती एसटी बस नेमकी कुठे आहे, हे प्रवाशांना माहीत व्हावे म्हणून मोबाइल ॲपसेवा १५ ऑगस्टला सुरू करण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली होती, मात्र अद्याप ती सेवा सुरू न झाल्याने अधिकाऱ्यांना त्यांच्याच घोषणेचा विसर पडल्याचे चित्र आहे.
एसटीची श्वेतपत्रिका जाहीर करताना जूनमध्ये प्रस्तुत प्रतिनिधीने मंत्री सरनाईक यांना ॲपसेवेविषयी विचारले असता त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या हवाल्याने १५ ऑगस्टचा मुहूर्त दिला होता. या सेवेचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे एप्रिलमध्ये सांगण्यात आले होते, तर सर्व काम पूर्ण झाले असून १५ ऑगस्ट रोजी ही ॲपसेवा सुरू करणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी म्हटले होते.
तांत्रिक बाबींमुळे ॲपला विलंब होत आहे. याबाबत मी स्वतः लक्ष घालत आहे. मंत्रालयामध्ये मी बैठक बोलावली असून चर्चा करणार आहे.
-प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
इशाऱ्याचे काय झाले? :
कंत्राटदाराने वेळेत काम पूर्ण न केल्यास त्याच्यावर कारवाई करणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी एप्रिलमध्ये सांगितले होते. २०१९ पासून या ॲपचे काम सुरू असून, ते सहा महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित होते.
असे माहीत होईल एसटीचे लोकेशन
प्रवाशांनी काढलेल्या तिकिटावर असलेला ट्रिप कोड एसटीच्या ॲप्लिकेशनमध्ये ट्रॅक बसवर टाकल्यावर तिचे लोकेशन समजू शकेल.
त्यामध्ये इतर मार्गावरील गाड्या, त्यांची वेळ, त्या सर्व गाड्यांच्या थांब्याचीही माहितीही मिळणार आहे. नियंत्रणासाठी एसटीच्या मुंबई सेंट्रल मध्यवर्ती कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.