Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 17:58 IST2025-12-19T17:31:33+5:302025-12-19T17:58:10+5:30
HC on Manikrao Kokate Arrest: सदनिका घोटाळा प्रकरणी दोन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि आमदार माणिकराव कोकाटे यांनाआज मुंबई उच्च न्यायालयाने थोडासा दिलासा दिला आहे.

Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
सदनिका घोटाळा प्रकरणी दोन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि आमदारमाणिकराव कोकाटे यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने थोडासा दिलासा दिला आहे. माणिकाराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला मुंबई हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे त्यांच्यावरील अटकेची कारवाई टळली आहे. कोर्टाने १ लाख रुपयांच्या जामिनावर माणिकराव कोकाटे यांची सुटका केली आहे. मात्र नाशिक न्यायालयातील दोषसिद्धीला कोर्टाने स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवर टांगती तलवार कायम आहे.
अजित पवार गटाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांना सदनिका घोटाळाप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी धरत दोन वर्षांची सक्तमजुरी व दहा हजारांचा दंड, अशी शिक्षा मंगळवारी सुनावली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी न्यायालयाने त्यांना अटक करण्यात यावी, असे वॉरंटही काढले होते. कोर्टाने अटक वॉरंट काढल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यासाठी पोलीस नाशिकहून रवाना झाले होते. मात्र तत्पूर्वीच प्रकृती अस्वस्थ्याच्या कारणावरून माणिकराव कोकाटे रुग्णालयात दाखल झाले होते. तसेच शिक्षेपासून दिलासा मिळावा यासाठी माणिकराव कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
माणिकराव कोकाटे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाला. त्यानंतर मुंबई हायकोर्टाने माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. तसेच कोर्टाने माणिकराव कोकाटे यांना १ लाख रुपयांचा जामीन मंजूर केला आहे. मात्र कोर्टाने माणिकराव कोकाटे यांना दोषमुक्त करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सदनिका घोटाळ्याप्रकरणी नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावणल्यानंतर माणिकराव कोकाटेंकडील क्रीडा व अल्पसंख्याक विकास ही खाती काढून घेण्यात आली होती. त्यानंतर माणिकराव कोकाटे हे बिनखात्याचे मंत्री राहिले होते. अखेरीस गुरुवारी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटेंचा राजीनामा राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे पाठवल्यानंतर राज्यपालांनी तो स्वीकारून कोकाटे यांना मंत्रिपदावरून मुक्त केले होते.