काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 19:40 IST2025-05-05T19:38:41+5:302025-05-05T19:40:34+5:30
Vijay Wadettivar, BJP vs Congress: 'काँग्रेस फोडा, पक्ष रिकामा करा' असं विधान भाजपाच्या बावनकुळेंनी केले होते

काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
Vijay Wadettivar, BJP vs Congress: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना, काँग्रेसला फोडा आणि काँग्रेस रिकामी करा, असा सल्ला दिला. काँग्रेसमधून कोणी आलं तरी तुमचा विचार अगोदर केला जाईल, असेही बावनकुळेंनी सांगितले. याचे काँग्रेसमधून तीव्र पडसाद उमटले. काही लोकं पक्ष सोडून जात आहेत, पण आमची वेळ आल्यावर याचा बदला घेऊ, असा इशारा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला.
विजय वडेट्टीवार यांचा भाजपावर निशाणा
"माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सर्वात प्रथम देशात सद्भावना यात्रेची सुरुवात केली होती. आता महाराष्ट्रात सद्भावना यात्रा सुरु झाली आहे. सद्भावना यात्रेच्या माध्यमातून दुभंगलेली मने जोडण्याचे काम केले जात आहे, समाजा-समाजाला जोडण्याचे काम होत आहे. भाजपा २०१४ पासून देशात व राज्यात जातीयतेचे व धर्मांधतेचे विष पेरत आहे. तरीही राज्यातील काँग्रेसची काही नेतेमंडळी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर आता भाजपा नेते काँग्रेस फोडण्याची भाषा करत आहेत. दुसऱ्याची घरे फोडण्याची सवय भाजपाला लागली आहे. आपण दुसऱ्याच्या मागे चालण्यापेक्षा स्वतःचा रस्ता स्वतः तयार करू. काही लोक पक्ष सोडून जात आहेत, पण आमची वेळ आल्यावर याचा बदला घेऊ," असे रोखठोक मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. परभणी शहर काँग्रेस कार्यालयापासून काढण्यात आलेल्या संविधान बचाव पदयात्रेत त्यांनी हे विधान केले.
सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून अदानी-अंबानींचे हित महत्वाचे!
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही भाजपावर हल्लाबोल केला. "राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरल्याने मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला. जातनिहाय जनगणना झाली तर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल. ओबीसीला २७ टक्के आरक्षण आहे ते सुद्धा ६५ टक्क्यांपर्यंत वाढू शकते. भाजपा मात्र जाती जातीत भांडणे लावत आहे अशावेळी बहुजन समाज एकत्र असणे ही काळाची गरज आहे. राज्यात रोज ६ शेतकरी आत्महत्या होत आहेत, मुलांना नोकरी मिळत नाही आणि सरकारला मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून अदानी अंबानींचे हित महत्वाचे वाटत आहे. गरज नसताना ८८ हजार कोटींचा शक्तीपीठ महामार्ग निर्माण करण्यात सरकार प्राधान्य देत आहेत.