Pension Second Wife: दुसऱ्या पत्नीला पतीच्या मृत्यूनंतर पेन्शन मिळते का? उच्च न्यायालयाने दिला महत्वाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 21:23 IST2022-02-16T21:22:39+5:302022-02-16T21:23:08+5:30
Pension Second Wife Solapur: सोलापूरच्या महिलेने राज्य सरकारविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Pension Second Wife: दुसऱ्या पत्नीला पतीच्या मृत्यूनंतर पेन्शन मिळते का? उच्च न्यायालयाने दिला महत्वाचा निर्णय
मुंबई उच्च न्यायालयाने दुसऱ्या पत्नीचा पतीच्या निधनानंतर पेन्शनवर किती हक्क असतो याबाबत महत्वाचा निकाल दिला आहे. दुसरी पत्नी पतीच्या निधनानंतर मिळणाऱ्या पेन्शनचा लाभ घेऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. हे तेव्हाच लागू असेल जेव्हा दुसरे लग्न पहिल्या पत्नीच्या मृत्यू किंवा घटस्फोटाशिवाय झाले असेल.
न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने सोलापूरच्या शामल टाटे यांच्या याचिकेवर हा निर्णय दिला आहे. टाटे यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. टाटे यांनी राज्य सरकारने त्यांना पेन्शनचा लाभ देण्यास नकार दिल्याविरोधात याचिका दाखल केली होती.
शामल यांचे पती सोलापूर जिल्हा कलेक्टर कार्यालयात शिपाई होते. त्यांचा १९९६ मध्ये मृत्यू झाला होता. महादेव यांनी पहिली पत्नी असताना दुसऱ्या महिलेशी विवाह केला होता. महादेव यांच्या मृत्यूनंतर दुसरी पत्नी शामल आणि पहिल्या पत्नीमध्ये समजुतीने पहिल्या पत्नीला पीएफच्या पैशांपैकी ९० टक्के आणि दुसऱ्या पत्नीला उरलेले १० टक्के आणि पेन्शन मिळेल असे वाटून घेतले होते.
मात्र, काही काळाने महादेव यांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला. यामुळे शामल यांनी राज्य सरकारला पत्र लिहून महादेव यांच्या पेन्शनची उरलेली रक्कम द्यावी अशी मागणी केली होती. राज्य सरकारने २००७ ते १४ मध्ये शामल यांचे चार अर्ज फेटाळले. याविरोधात शामल यांनी २०१९ मध्ये उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. यावर न्यायालयाने पहिले लग्न जोवर कायदेशीर रित्या समाप्त होत नाही तोवर दुसऱ्या लग्नाला हिंदू विवाह कायद्यात मान्यता नाही. यामुळे पहिली पत्नीच कायदेशीररित्या पेन्शन मिळवू शकते. यामुळे या प्रकरणी दुसऱ्या पत्नीला पेन्शन देता येत नाही.