So why didn't the BJP want a CBI inquiry into Gopinath Munde's death? Shiv Sena's question | तेव्हा भाजपाला गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी का करावीशी वाटली नाही? शिवसेनेचा सवाल

तेव्हा भाजपाला गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी का करावीशी वाटली नाही? शिवसेनेचा सवाल

ठळक मुद्दे शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत असताना त्याची कधी सीआयडी चौकशीची मागणी भाजपने केली नाहीबिहारमध्ये राजपूत समाजाची मते हवी असल्यानेच भाजपकडून असे राजकारण सुरू आहेयांच्या टाळूवरचे लोणी खाऊन भाजपला सत्ता मिळवायची आहे

जळगाव - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून सध्या राजकारणामध्ये शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना रंगला आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजपाला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांनी टोला लगावला आहे. भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांचा अचानक मृत्यू झाला तेव्हा भाजपाला त्यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी असे का वाटले नाही, अशी विचारणा गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

जळगावमधील एका कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, राष्ट्रपतीसारख्या महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीचा कार्यक्रम माध्यमांवर मिनिट टू मिनिट दाखवला जातो. परंतु, सुशांतसिंग राजपूत आणि कंगना यांच्या बाबतीत आता माध्यमे मिनिट टू मिनिट कार्यक्रम दाखवत आहेत. हे अयोग्य आहे. सुशांतने काय देशासाठी हौतात्म्य पत्करले आहे का? तो दारू, सिगारेट घेणारा होता. त्याच्या बाबतीत साऱ्या गोष्टी उलगडल्या आहेत. असे असताना टीव्हीवर मात्र, चीनची बातमी दिसत नाही. एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत असताना त्याची कधी सीआयडी चौकशीची मागणी भाजपने केली नाही. 52 टक्के रोजगार देणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येची कधी सीआयडी चौकशी होत नाही. एवढेच काय तर गोपीनाथ मुंडेंसारख्या बड्या नेत्याच्या मृत्यूची सीआयडी चौकशी भाजपला का करावीशी वाटली नाही? बिहारमध्ये राजपूत समाजाची मते हवी असल्यानेच भाजपकडून असे राजकारण सुरू आहे. यांच्या टाळूवरचे लोणी खाऊन भाजपला सत्ता मिळवायची आहे. म्हणूनच भाजपचे हे थोतांड सुरू असल्याचा घणाघात देखील गुलाबराव पाटील यांनी यावेळी केला. मात्र ज्या भाजपाच्या सत्ताकाळात  शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची सीआयडी चौकशी झाली नाही असे विधान गुलाबराव पाटील यांनी केले, त्याच काळात भाजपासोबत शिवसेनाही सत्तेत सहभागी होती. 

आता खडसेंनी पूर्ण युद्ध लढायला हवे
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या रुपाने उत्तर महाराष्ट्रातील एक ओबीसी नेता संपवला आहे. ग्रामीण भागातील ओबीसी नेत्यांना संपवण्यासाठी ते असेच प्रयत्न करत आहेत, अशी टीका सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा शिवसेनेचे प्रवक्ते गुलाबराव पाटील यांनी जळगावात फडणवीस यांच्यावर केली.  खडसेंच्या विषयावर बोलताना गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, एकनाथराव खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील युद्ध असेच चालते, पण पुन्हा बंद पडते. हे युद्ध कायम चालत राहिले पाहिजे. कोणतीही गोष्ट हातात घेतली म्हणजे ती धसास लावली पाहिजे. खडसे यांच्या रुपाने फडणवीस यांनी आमच्या उत्तर महाराष्ट्राचा एक ओबीसी नेता संपवला आहे. आता खडसेंनी पूर्ण युद्ध लढायला हवे. बोलायचे आणि पुन्हा बंद करायचे, हे माझ्या स्वभावात बसत नाही. खडसेंनी आता आरपारची लढाई लढली पाहिजे. खडसे बोलतील आणि शांत राहणार असतील तर त्यांच्या बोलण्याला महत्त्व राहणार नाही. युद्ध आणि कुस्ती कधीही अपूर्ण खेळायची नसते, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

उन्मेष पाटील यांना लाज वाटत असेल तर स्वतःला अटक करून घ्यावी
मुंबईत नौदलाच्या एका माजी अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केली, याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता गुलाबराव पाटील भाजपवर चांगलेच भडकले. ते म्हणाले, भाजप नाहक राजकारण करत आहे. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक हे सैनिकांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे दीड वर्षे निलंबित राहिले. भाजपचे हे काही पहिले प्रकरण नाही. हे बेशरम लोक आमच्यावर काय टीका करतील? यांची आमच्यावर टीका करण्याची लायकी नाही. भाजपचे तत्कालीन आमदार उन्मेश पाटील यांनी देखील एका माजी सैनिकाला मारहाण केली होती. परंतु, आजपर्यंत त्यांना अटक झालेली नाही. त्यांना लाज वाटत असेल तर त्यांनी स्वतःहून अटक करून घ्यावी. स्वतः सैनिकाला मारहाण करतात आणि नंतर टीव्हीसमोर येऊन शहाणपणा करतात. हे म्हणजे 'उलटा चोर कोतवाल को डाँटे' असाच प्रकार आहे, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

English summary :
So why didn't the BJP want a CBI inquiry into Gopinath Munde's death? Shiv Sena leader Gulabrao Patil's question

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: So why didn't the BJP want a CBI inquiry into Gopinath Munde's death? Shiv Sena's question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.