‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 13:28 IST2025-10-20T13:27:38+5:302025-10-20T13:28:12+5:30
Bachchu Kadu News: माजी आमदार आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे वादाला तोंड फुटले आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी वतनदारी बंद केल्याने त्यांच्या सासऱ्यांनी त्यांची हत्या केली. या औरंगेजब बादशाहचं नाव विनाकारण बदनाम झालं, असे विधान बच्चू कडू यांनी केले.

‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान
माजी आमदार आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे वादाला तोंड फुटले आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी वतनदारी बंद केल्याने त्यांच्या सासऱ्यांनी त्यांची हत्या केली. या औरंगेजब बादशाहचं नाव विनाकारण बदनाम झालं, असे विधान बच्चू कडू यांनी केले.
बुलढाणा येथील पातुर्डा येथे शेतकरी हक्क परिषदेत उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करताना बच्चू कडू यांनी हे विधान केलं. ‘छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळात स्वराज्यामध्ये वतनदारीची पद्धत बंद केली गेली. वतनदारीमधून निजामशाही, आदिलशाही चालत असे. ही वतनदारी बंद करण्यात आल्याने छत्रपती संभाजी महाराज हे त्यांच्या सासऱ्यांकडून मारले गेले. मात्र यात मुघल बादशाह औरंगजेब याचं नाव बदनाम झालं. राजा असा असावा, त्याने मरण पत्करणे स्वीकारले, पण सासऱ्याला वतन दिले नाही’, असे बच्चू कडू म्हणाले.
यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरूनही कडू यांनी सरकारवर टीकास्र सोडलं. राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारने शेतकऱ्यांची भगव्या, निळ्या हिरव्या रंगात विभागणी केली आहे. शेतकरी हे जातीधर्मात विभागले गेल्याने एकत्र येत नाहीत. जर शेतकरी एकत्र आले तर सरकार एका दिवसात सरळ होईल, असं विधानही त्यांनी केलं. तसेच आत्महत्या करणं हा पर्याय नाही. आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका असं धक्कादायक आवाहनही त्यांनी केलं.
तसेच गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाबाबतही बच्चू कडू यांनी मोठं भाष्य केलं. ते म्हणाले की, राजकारण्यांचे मोर्चे , मेळावे यांना प्रचंड गर्दी असते. पण शेतकरी परिषदेला गर्दी कमी असते. शरद जोशी हे अडीच लाख पगाराची नोकरी सोडून शेतकऱ्यांसाठी लढले, पण शेतकऱ्यांनी त्यांचा पराभव केला. बाबासाहेब आंबेडकरांचा पराभवही शेतकऱ्यांनीच केला. मलाही शेतकऱ्यांनी पाडलं, कारण मी त्यांच्या जातीत बसलो नाही, असा दावा ही बच्चू कडू यांनी यावेळी केला.