‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 08:36 IST2025-07-27T08:35:42+5:302025-07-27T08:36:55+5:30

Mahayuti News: विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मंत्रिपदाबाबत चर्चा सुरू आहे.

skillful decision in shiv sena and ncp clash will rahul narvekar receive a reward as a ministerial for his service to the mahayuti | ‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!

‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!

Mahayuti News: सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभेचे अध्यक्ष करणार, ॲड. राहुल नार्वेकर यांना मंत्री करणार, गिरीश महाजन यांना डच्चू देणार अशा बातम्या सध्या फिरत आहेत. तसेच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेणार की त्यांचे खाते बदलणार की त्यांना कायम ठेवणार, याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे समजते. यातच राहुल नार्वेकर यांच्या मंत्रि‍पदाच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरल्याचे पाहायला मिळत आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवस दिल्लीत होते. तेथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबत काय तो निर्णय होईल, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील फेरसहभागाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. राज्य मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होणार असल्याचा दावा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते  संजय राऊत  यांनी केला होता. मंत्रिमंडळातील चार ते पाच मंत्र्यांना  डच्चू देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.  या पार्श्वभूमीवर सध्या भाजपामध्ये  नाराज असलेल्या माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभाध्यक्ष म्हणून  संधी देण्यात येणार असून, राहुल नार्वेकर यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. 

राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मंत्री होण्याची चर्चा सुरू आहे. पहिल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांनी धनुष्यबाण, घड्याळाचे वाटप केले त्यावरून त्यांच्यातील कौशल्य सरकारच्या लक्षात आले. पुढचे चार-साडेचार वर्ष सरकारला तसा कोणताही धोका नाही. त्यामुळेच कदाचित त्यांचे हे कौशल्य सरकारच्या कामी यावे म्हणून त्यांच्या मंत्रिपदाची चर्चा सुरू झाली नसेल का? पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू, असे नार्वेकर म्हणाल्याच्या बातम्या छापून आल्या. ज्याला कोणाला मंत्री व्हायचे असेल, मंत्रिपदावरून पायउतार व्हायचे असल्यास त्याच्या तोंडी हे वाक्य परफेक्ट बसते. एकेका वाक्याचे नशीब असते दुसरे काय?, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात असल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याची चर्चा असताना ‘विधानसभाध्यक्ष असो वा मंत्री किंवा आमदार म्हणून काम असो; शेवटी काम हे जनतेसाठीच करत राहायचे असते. मी माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवतो. त्यामुळे पक्ष मला जी जबाबदारी देईल ती मी पार पाडणार आहे. जी माझ्या पक्षाची इच्छा तीच माझी इच्छा,’ असे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते. 

 

Web Title: skillful decision in shiv sena and ncp clash will rahul narvekar receive a reward as a ministerial for his service to the mahayuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.