आधी म्हणाले, श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस आली; आता संजय शिरसाटांचा यू-टर्न; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 16:05 IST2025-07-10T16:05:22+5:302025-07-10T16:05:55+5:30
Shrikant Shinde Income Tax Notice: खा. श्रीकांत शिंदेंना आयकर विभागाने नोटीस पाठवल्याचे वक्तव्य संजय शिरसाट यांनी केले होते.

आधी म्हणाले, श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस आली; आता संजय शिरसाटांचा यू-टर्न; म्हणाले...
Shrikant Shinde Income Tax Notice: मुंबईत सध्या राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अधिवेशन सोडून काल अचानक दिल्लीत गेले होते. त्यांच्या दिल्ली दौऱ्याची माहिती माध्यमांनाही नव्हती. आज सकाळी याबाबतची माहिती समोर आली. अशातच राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांनी खासदार श्रीकांत शिंदेंना (Shrikant Shinde) आयकर विभागाची नोटीस मिळाल्याचे वक्तव्य केल्याने मोठा गोंधळ उडाला.
या वृत्ताने राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मात्र, पुन्हा संजय शिरसाटांनी माध्यमांसमोर येऊन आपले वक्तव्य मागे घेतले. आपल्या तोंडी हे वाक्य घातल्याचे स्पष्टीकरण शिरसाटांनी दिले. संजय शिरसाट म्हणाले की, मला आयकर विभागाची नोटीस आली आहे. काही पत्रकारांनी विचारले श्रीकांत शिंदेंनासुद्धा नोटीस आली आहे का? तर मी म्हटले त्यांना नोटीस आली असेल, तर त्याबाबत मला माहीत नाही. श्रीकांत शिंदेंना नोटीस आली की नाही, हे मला माहित नाही, हे वाक्य माझ्या तोंडी घातले, असे स्पष्टीकरण शिरसाटांनी दिले.
संजय शिरसाटांना आयकर विभागाची नोटीस
संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथील जाहीर कार्यक्रमात आपल्याला आयकर खात्याची नोटीस आल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वी संभाजीनगरमधील विटस् हॉटेल लिलावात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप विरोधकांनी केले होते. यात शिरसाटंचा मुलगा गुंतल्याचा आरोपही झाला. विरोधकांनी पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा लावून धरला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणात उच्चस्तरीय समितीतर्फे चौकशीची घोषणा केली.
एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी विट्स प्रकरणी तक्रार केल्यानंतरच आयकर खात्याचे लक्ष शिरसाट यांच्याकडे वळल्याचे बोलले जात आहे. आता त्यांच्याकडील संपत्ती, आर्थिक व्यवहार आणि करदायित्व यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. मंत्री शिरसाट यांनी नोटीस मिळाल्याची कबुली दिल्यानंतर माजी खासदार जलील यांनी या प्रकरणात सत्य समोर आले पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.