Devendra Fadnavis : "अंदमानच्या काल कोठडीत सावरकरांनी जे अत्याचार सहन केले, तसे अत्याचार सहन करणारा एक नेता मला दाखवा"
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 22:10 IST2022-11-16T22:06:40+5:302022-11-16T22:10:26+5:30
"स्वातंत्र्यवीर सावरकरांना हे माहीत होते, की हा देश तोवर दुर्बल राहील, जोवर येथील हिंदू समाज आपली जातीव्यवस्था, वर्णभेद संपवून एकत्रित होणार नाही, जोवर येथील हिंदू समाज मजबूत होत नाही."

Devendra Fadnavis : "अंदमानच्या काल कोठडीत सावरकरांनी जे अत्याचार सहन केले, तसे अत्याचार सहन करणारा एक नेता मला दाखवा"
स्वातंत्र्य लढ्यातील सर्वच नेत्यांबद्दल मला प्रचंड आदर आहे. पण माझा सवाल आहे, की ज्या प्रमाणे अंडमानच्या काल कोठडीत दुहेरी काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असताना अकरा वर्ष जे अनन्वित अत्याचार स्वातंत्र्यावीर सावरकरांनी सहन केले, एक नेता मला दाखवा. अशा प्रकारचे अत्याचार सहन करणारा एक नेता मला दाखवा. त्यातही, अशा प्रकारचे अत्याचार सहन करत असातानाही त्यांच्या मनात स्वातंत्र्य लक्ष्मीचीच पूजा होती आणि त्यांनी स्वातंत्र्य लक्ष्मीचेच गीत गायले आणि तेच गीत तेथे लिहिले, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात बोलत होते. राहुल शेवाळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांना महाराष्ट्रातील जनताच उत्तर देईल -
फडणवीस म्हणाले, "स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशाचे एक असे एकमेव स्वातंत्र्य सेनानी आहेत, ज्यांनी स्वातंत्र्यापूर्वीही कारावास भोगला, स्वातंत्र्यानंतर उपहासाचा कारावास भोगला आणि आजही ज्यांच्या विचारांना कारावासात टाकण्याचे प्रयत्न सातत्याने काँग्रेसच्या वतीने होत आहे. रोज खोटे बोलायचे, रोज चुकीचे सांगायचे आणि निर्लज्जपणे वागायचे, हे जे काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते राहूल गांधी करत आहेत, त्यांना महाराष्ट्रातील जनताच उत्तर देईल."
हा देश तोवर दुर्बल राहील, जोवर येथील हिंदू समाज जातीव्यवस्था संपवून संघटित होणार नाही -
"आज स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून ते बाळासाहेब ठाकरेंपर्यंत हा जो हिंदूत्वाचा विचार आहे, या हिंदूत्वाच्या विचाराचा जो धागा आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांना हे माहीत होते, की हा देश तोवर दुर्बल राहील, जोवर येथील हिंदू समाज आपली जातीव्यवस्था, वर्णभेद संपवून एकत्रित होणार नाही, जोवर येथील हिंदू समाज मजबूत होत नाही. कारण त्यांना इतिहास माहीत होता, की जोवर येथील हिंदू समाज मजबूत होता संघटित होता तोवर यावर आक्रमण करण्याची कुणाचीही हिंमत नव्हती. अनेक आक्रमणे परतवून लावण्याचे काम या देशाने केले.
पण, हा हिंदू समाज जेव्हा दुर्बल झाला. ज्यावेळी अपराध बोधाने हा हिंदू समाज ग्रसित झाला आणि ज्यावेळी जाती जातीत आणि वर्णावर्णात हा हिंदू समाज विभागला गेला, त्यानंतरच कधी मोगलांनी, कधी इंग्रजांनी आपल्या आधिपत्याखाली ठेवले. म्हणून जरी स्वातंत्र्य मिळले तरीही, हा हिंदूसमाज मजबूत नसेल, जो या देशाचा आत्मा आहे. आत्माच नसेल, तर देश कसा राहणार? हा आत्मा जर मजबूत नसेल, तर हा देश पारतंत्र्यातच जाईल आणि म्हणून एकीकडे हिंदू समाजाला एकत्रीत करण्याचे कामही सावरकरांनी केले," असेही फडणवीस यावेळी म्हणाले.