राज्यातील १,१६४ शाळांत मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह नाही, हजारो शाळा आजही अंधारात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 12:37 IST2026-02-05T12:25:28+5:302026-02-05T12:37:38+5:30
राज्यातील १,१६४ शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहाची सोय नसल्याचे आणि ३,३२८ शाळांमध्ये वीजही नसल्याचे भीषण वास्तव शिक्षण विभागाच्या सांख्यिकी अहवालातून उजेडात आले आहे.

राज्यातील १,१६४ शाळांत मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह नाही, हजारो शाळा आजही अंधारात!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील १,१६४ शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहाची सोय नसल्याचे आणि ३,३२८ शाळांमध्ये वीजही नसल्याचे भीषण वास्तव शिक्षण विभागाच्या सांख्यिकी अहवालातून उजेडात आले आहे. मुंबई, गोंदिया, कोल्हापूर, सातारा आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये मात्र मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहांची शंभर टक्के सुविधा आहे.
मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह नसलेल्या शाळांमध्ये १,०४३ शासकीय, ६४ खासगी अनुदानित, २० खासगी विनाअनुदानित आणि ३७ सेल्फ फायनान्स शाळांचा समावेश आहे. वर्ष २०२४ ते २०२६ या दोन वर्षातील शिक्षण विभागाचा सांख्यिकी अहवाल २९ जानेवारीला शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना सादर केला गेला. त्यातून शाळांमधील भीषण वास्तव अधोरेखीत झाले आहे.
मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह नसलेल्या सर्वाधिक ११२ शाळा बीड जिल्ह्यात आहेत. हिंगोली, नांदेड, परभणी, गडचिरोली, जळगाव, अमरावती, नाशिक आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ५० ते १०० शाळांमध्ये ही सुविधा नाही. तर २० जिल्ह्यांमध्ये ५० पेक्षा कमी शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह नसल्याचे अहवालात म्हटले आहे.
वीज नसलेल्या ३,३२८ शाळांमध्ये ३,१०२ शासकीय, १३१ खासगी अनुदानित, १९ विनाअनुदानित आणि ७६ सेल्फ फायनान्स शाळांचा समावेश आहे. वीज नसलेल्या शाळांचा तपशील : नंदुरबार- ४५५, गडचिरोली- ४३१, बीड- ३८६, नांदेड- २२९, परभणी- २००, हिंगोली- १७४, धुळे -१६३, नाशिक- १६३, संभाजीनगर- १५७, लातूर- १३६, जालना- ११८.
आमच्या उच्चस्तरीय बैठकीत शाळांमधील सुविधांच्या कमतरतेबाबतचा अहवाल सादर झाला. येत्या एक महिन्यात संबंधित शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहांची व्यवस्था केली जाईल, असे शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंग देवोल यांनी म्हटले आहे.
राज्यातील ‘हँडवॉश’ सुविधा नसलेल्या शाळा
राज्यातील २,४२८ शाळांमध्ये हँडवॉश दिले जात नाही. अशा शाळांमध्ये १,५८७ शासकीय, ४५८ खासगी अनुदानित, ५६ विनाअनुदानित आणि ३२७ सेल्फ फायनान्स शाळांचा समावेश आहे. यामुळे संताप व्यक्त व्यक्त करण्यात येत आहे.
१९ शाळांमध्ये पाण्याचा अभाव; पुण्यातील दोन
पाण्याची सुविधा नसलेल्या राज्यातील शाळांची संख्या १९ आहे. धुळे, जळगाव, गोंदिया, गडचिरोली, बीड, सोलापूर, सांगली येथे अशी प्रत्येकी १ शाळा आहे. नांदेड- ५, पुणे- २, अहिल्यानगर- २, कोल्हापूर- ३.