Maharashtra Politics: “रामकुंडात पापं बुडवतात, भाजपलाही आम्ही इथेच बुडवू”; संजय राऊतांची घणाघाती टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 16:35 IST2023-02-15T16:34:58+5:302023-02-15T16:35:59+5:30
Maharashtra News: कुठेही गेले तरी अमित शाहांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद लाभणार नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली.

Maharashtra Politics: “रामकुंडात पापं बुडवतात, भाजपलाही आम्ही इथेच बुडवू”; संजय राऊतांची घणाघाती टीका
Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत आहे. एकीकडे ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष तीव्र होत असून, दुसरीकडे ठाकरे गटाकडून सातत्याने भाजपवर सडकून टीका केली जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतनाशिक दौऱ्यावर असून, भाजपवर निशाणा साधला. नाशिक ही पवित्र जागा असून इकडे सगळी पापे रामकुंडामध्ये बुडवली जातात, या भाजपला आम्ही इथेच बुडवू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
अमित शाह कुठेही गेले तरी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद काही लाभणार नाही, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना तुम्ही शेवटपर्यंत अभय दिले, त्यांचे समर्थन केले, त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना मानणारा या महाराष्ट्रातला समाज पाठिंबा देईल असे वाटत असेल तर त्यांचा गैरसमज आहे, या शब्दांत संजय राऊत यांनी अमित शाहांच्या दौऱ्याचा समाचार घेतला.
रामकुंडात पापे बुडवतात, भाजपलाही इथेच बुडवू
भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत नाशिकवर कमळ फुलणार, असा नारा देण्यात आला. यावर बोलताना, नारा देऊ दे त्यांना, मात्र नाशिकवर भगवाच फडकणार हे लिहून घ्या. बाळासाहेब ठाकरे यांचे नाशिकवर अतीव प्रेम होते. मात्र आता गिरीश महाजन यांच्यासारख्या लोकांनी नाशिकची जी परिस्थिती केली आहे, त्यामुळे नाशिककरांना वीट आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी पहिले महाअधिवेशन नाशिकमध्ये घेतले होते. नाशिक ही पवित्र जागा असून इकडे सगळी पापे रामकुंडामध्ये बुडवली जातात, या भाजपला आम्ही इथेच बुडवू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
दरम्यान, शिवाजी महाराजांचा भगवा कोणीही खांद्यावर घेऊ शकतं. देशातील कोणताही नागरिक शिवरायांचे विचार पुढे नेण्याचं काम करत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. सेनेला कोणाचाही फटका बसत नाही, शिवसेना फटके देते, असे संजय राऊत म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"