“जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर अभिमान वाटेल”; शिंदे गटातील नेत्यांनी थेट सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 16:18 IST2024-12-10T16:16:25+5:302024-12-10T16:18:47+5:30

Maharashtra Vidhan Sabha Assembly Election 2024 Result: जयंत पाटील यांचा योग्य वेळी योग्य निर्णय काय होतो, याकडे आमचे लक्ष लागून आहे, असे शिंदे गटातील नेत्यांनी म्हटले आहे.

shiv sena shinde group uday samant said jayant patil will be proud if he joins the mahayuti | “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर अभिमान वाटेल”; शिंदे गटातील नेत्यांनी थेट सांगितले

“जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर अभिमान वाटेल”; शिंदे गटातील नेत्यांनी थेट सांगितले

Maharashtra Vidhan Sabha Assembly Election 2024 Result:  देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून नवनिर्वाचित आमदारांना शपथबद्ध करण्यात आले. यानंतर विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनासाठी मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या प्रस्तावावर अनेक सदस्य बोलले. यावेळी झालेल्या काही सूचक सूतोवाचावरून राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. याबाबत शिवसेना शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली.

ज्या महाविकास आघाडीने ईव्हीएमविरोधात रान उठवले आहे, त्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत केलेले भाषण अधोरेखित करण्यासारखे होते. जयंत पाटील म्हणाले की, शासनाविरोधात आम्ही टोकाला जाऊन प्रचार केला, टोकाला जाऊन आम्ही टीका केली; परंतु, महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला. आम्हाला अल्प मतात आणले, हे आम्हाला मान्य केले पाहिजे. अशी भूमिका जयंत पाटील यांची असेल, तर याचा अर्थ ईव्हीएमवरील निकाल योग्य आहे आणि म्हणून महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार शपथबद्ध झाले, असे उदय सामंत यांनी नमूद केले. 

महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणात संभ्रम

तसेच विधानसभेच्या अध्यक्षांबाबत जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सकारात्मक भूमिका घेऊन त्यांनी आम्हाला न्याय दिला, अशी भूमिका मांडली. त्यावेळी महाविकास आघाडीतील एक पक्ष ठाकरे गट सांगतो की, आम्हाला वॉक-आऊट करायचे आहे. महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणात संभ्रम असून, नेमके काय चालले आहे, असा प्रश्न पडतो, असे उदय सामंत म्हणाले. 

जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर अभिमान वाटेल

सभागृहात विनोदाने काही चर्चा होत असते. तेव्हा अजित पवार जयंत पाटील यांना उद्देशून म्हणाले की, माझे पूर्ण लक्ष तुमच्यावर आहे. तेव्हा लगेच जयंत पाटील यांनी उत्तर दिले की, दादा राष्ट्रवादी काँग्रेसचे ब्रीदवाक्यच आहे की, योग्य वेळी योग्य निर्णय. त्यामुळे जयंत पाटील यांचा योग्य वेळी योग्य निर्णय कसा आणि काय होतो, याकडे आमचे लक्ष लागून आहे. जयंत पाटील यांनी आता ठरवायचे आहे. जयंत पाटील ज्येष्ठ नेते आहेत. जयंत पाटील यांनी अनेक वर्ष अर्थसंकल्प मांडला आहे. इरिगेशन, ग्रामविकास खाते सांभाळले आहे. जयंत पाटील हे योग्य वेळी योग्य निर्णय या टॅगलाइन खाली महायुतीत येणार असतील, तर नक्कीच आम्हाला अभिमान वाटेल. चांगले वाटेल, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले. 
 

Web Title: shiv sena shinde group uday samant said jayant patil will be proud if he joins the mahayuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.