“उद्या बाळासाहेबांच्या आवाजात शरद पवार, सोनिया गांधी देवमाणूस आहेत असे वदवून घ्याल”
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 17:59 IST2025-04-18T17:54:46+5:302025-04-18T17:59:20+5:30
Shiv Sena Shinde Group News: ठाकरे गटाचा हा पोरखेळ आहे, अशी टीका करण्यात आली आहे.

“उद्या बाळासाहेबांच्या आवाजात शरद पवार, सोनिया गांधी देवमाणूस आहेत असे वदवून घ्याल”
Shiv Sena Shinde Group News: नाशिकमध्ये ठाकरे गटाचे निर्धार शिबिर आयोजित करण्यात आले होते. ठाकरे गटाचे अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते या शिबिरासाठी आले होते. या शिबिरात संजय राऊत, आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केले. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मार्गदर्शन केले. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे एआयचा वापर करून एक भाषण दाखवण्यात आले. यावरून आता शिवसेना शिंदे गटासह महायुतीतील नेते ठाकरे गटावर टीका करताना पाहायला मिळत आहेत.
ठाकरे गटाच्या नाशिक येथील शिबिरात एआयच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण ऐकविण्यात आले. त्याप्रसंगी माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्यासह एका बाजूला बाळासाहेब ठाकरे आणि दुसऱ्या क्लिपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र अशा घटना दाखवून त्यावर भाष्य करण्यात आले. यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धवसेनेवर टीका केल्यानंतर शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील यांनीही ठाकरे गटावर हल्लाबोल केला.
ठाकरे गटाचा हा पोरखेळ सुरू आहे
AI तंत्रज्ञानाने बाळासाहेब ठाकरेंचा आवाज काढून उद्धव ठाकरेंनी त्यांच्या विचारांची तोडफोड केली आहे. उद्या बाळासाहेबांच्या आवाजात शरद पवार आणि सोनिया गांधी देवमाणूस आहेत, असेही तुम्ही वदवून घ्याल. ठाकरे गटाचा हा पोरखेळ सुरू आहे. संजय राऊत रात्री विचार करून सकाळी राजकीय कळ लावतात. उद्या सोनिया गांधी या देशाच्या महान नेत्या होत्या, असेही बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजात काढून घेण्याचे काम संजय राऊत करू शकतात. त्यामुळे AI तंत्रज्ञानाने बाळासाहेब ठाकरेंचा आवाज निर्माण करणे योग्य नाही, अशी टीका शहाजी बापू पाटील यांनी केली.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांमध्ये राज्यात भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी युती करूनच लढतील, असा विश्वास व्यक्त करताना, दुष्काळी सांगोला, माळशिरस आणि पंढरपूर तालुक्याला नीरा देवधरचे पाणी मिळण्यास महाविकास आघाडीचे संजीवराजे निंबाळकर यांनी विरोध केल्याने शहाजीबापू पाटील यांनी त्यांचा निषेध व्यक्त केला.