“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 20:36 IST2025-09-29T20:36:11+5:302025-09-29T20:36:11+5:30
Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat News: अत्यंत भयानक परिस्थिती आहे. काही भाग वगळला तर सर्वत्र पाणी दिसत आहे, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat News: अत्यंत भयानक परिस्थिती आहे. काही भाग वगळला तर सर्वत्र पाणी दिसत आहे. शेतकऱ्यांचे देखील अतोनात नुकसान झालेले आहे. सरसकट तर पंचनामे होतीलच. मात्र, त्यांना आता भरीव मदत सरकार ती देईल. उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि त्यात मुख्यमंत्री काही घोषणा करतील, असे मला वाटते, अशी माहिती राज्याचे मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी दिली.
संजय शिरसाट पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, राज्य शासनाने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पाच टक्के निधी यासाठी वापरण्याची मुभा दिलेली आहे. ज्या ठिकाणी रस्ते तुटले आहेत, पुल वाहून गेले आहेत, त्या ठिकाणी तातडीने काम करण्यासाठी आम्हाला वाव मिळाला आहे, गावाला जोडण्याची ही एक संधी आहे, असेही शिरसाट यांनी म्हटले आहे.
आई अंबाबाई देवीचे शिवसेनेसह सर्वांकडे लक्ष आहे
दुसरीकडे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी आई अंबाबाई मंदिरामध्ये देवीचे दर्शन घेतले. खासदार श्रीकांत शिंदे यांनी अंबाबाई देवीच्या चरणी महाराष्ट्रावर आलेले महापुराचे संकट दूर करण्याची सरकारला ताकद द्यावी, अशी प्रार्थना केली. महाराष्ट्रावर जेव्हा संकट आले आहे, तेव्हा सरकारने मदत करण्याची भावना ठेवून मदत केली आहे. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सरकारने नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले आहे. यावेळी शेतकऱ्यांना पूर्ण दिलासा दिला जाईल. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी येणाऱ्या काळात बैठका सुरू होतील. आई अंबाबाई देवीचे शिवसेनेसह सर्वांकडे लक्ष आहे, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.
दरम्यान, सर्व मंत्र्यांनी दौरे केले. शेतकऱ्यांचा रोष, नाराजी, राग, विरोध पाहायला मिळाला. जेव्हा घरदार उध्वस्त होते. शेतीचे प्रचंड नुकसान होते. जमीन वाहून जाते, तेव्हा साहजिक अशा प्रतिक्रिया उमटतात. दिवाळीपर्यंत बळीराजाला या संकटातून बाहेर काढण्याचे नियोजन आहे. आता तातडीची पाच हजार रुपये, अन्न-धान्य, कपडे, निवारा अशी मदत केली जात आहे. सरकार त्यांच्या पाठीशी आहे. त्याप्रमाणे निर्णय आम्ही घेणार आहोत. शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल, असे आमचे नियोजन आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.